महिलेचा शस्त्रक्रियेपश्चात मृत्यू, दोन डॉक्टरांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंत्रालयाकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:48 IST2025-01-21T12:46:45+5:302025-01-21T12:48:54+5:30
Bhandara : ७ तास चाललेल्या ठिय्या आंदोलनानंतर प्रशासनाचा तोडगा

Woman dies after surgery, proposal to suspend two doctors submitted to ministry
लोकमत न्यूज नेटवर्क
विरली (बु) / लाखांदूर: डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मेघा आकाश बनारसे (वय २४) या महिलेची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अयशस्वी झाली. त्यामुळे प्रकृती खालावल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करीत मृतदेहासह रास्ता रोको आंदोलनानंतर अखेर घटनेस जबाबदार असलेल्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सोमवारी मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे.
निलंबनाचा प्रस्ताव पाठविलेल्यांमध्ये बारव्हा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी चंद्रसुरेश होंगरवार आणि प्रसूतीतज्ज्ञ रोशनी राऊत यांचा समावेश आहे. या डॉक्टरांवर आता काय कारवाई होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
महिलेच्या मृत्यूनंतर रविवारी दुपारी तीन वाजेपासून सुरू झालेले आंदोलन तब्बल ७ तासांनंतर विविध अधिका-यांसमक्ष प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर रात्री दहा वाजता मागे घेण्यात आले होते. खासदार, जिल्हा पोलिस अधिक्षक, यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली होती. त्यानंतर मृतदेह राज्यमार्गावरून उचलून रात्री उशिरा अंतिम संस्कार करण्यात आले.
मेघा आकाश बनारसे या महिलेवर १६ नोव्हेंबर २०२४ रोजी सरांडी (बु) प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिबिरात शस्त्रक्रिया पार पडली. त्याच दिवशी सायंकाळपासून तिला असह्य वेदना सुरू झाल्या. सलग तीन दिवस असा वेदना होत असताना संबंधित डॉक्टर व चमूकडून तिच्या त्रासाचे निदान आणि त्यावर अपेक्षित उपचार न मिळाल्याने अखेर नाइलाजास्तव मरणाला टांगलेल्या मेघाला शस्त्रक्रियेच्या तिसऱ्या दिवशी भंडारा व त्यानंतर ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करावे लागले. लाखांचा खर्च करूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने कुटुंबीयांनी नागपूर शासकीय मेडिकल कॉलेज येथे १८ जानेवारीला भरती केले. मात्र, तिथे भरती केल्याच्या दिवशीच रात्री नऊच्या सुमारास उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
प्रस्ताव पाठविला, अधिकाऱ्यांनी दिला दुजोरा
या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर यांना विचारणा केली असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. डॉ. डोंगरवार यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून, तर डॉ. राऊत यांचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सकांकडून पाठविण्यात आला आहे. आम्ही कारवाई प्रस्तावित केली असून आता यावर मंत्रालय स्तरावर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
दोन चिमुकल्यांची आबाळ
मृत मेघाला साडेतीन व एक वर्ष वयाची दोन मुले आहेत. तिच्या दुर्दैवी मृत्यूमुळे या दोन चिमुकल्यांची आबाळ होऊ नये, यासाठी त्यांच्या पोषणाची जबाबदारी सरकारने घ्यावी, अशी आमची मागणी असण्याची आंदोलकांनी सांगितले होते. यापूर्वी २ जानेवारीला बनारसे कुटुंबीयांनी संरांडी (बु) प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर उपोषण केले होते.