पालकमंत्री होणार तरी कोण, जयस्वाल की बावनकुळे ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 13:15 IST2024-12-28T13:12:33+5:302024-12-28T13:15:18+5:30
जिल्हावासीयांना प्रतीक्षा : नवे वर्ष उगविण्यापूर्वी होणार घोषणा

Who will be the Guardian Minister, Jaiswal or Bawankule?
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : निकाल लागून सव्वा महिना उलटला. नागपुरातील हिवाळी अधिवेशही झाले. मात्र अद्याप पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा झालेली नाही. त्यामुळे भंडारा जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे जाईल, असा प्रश्न आता विचारला जात आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि वित्त नियोजन, कृषी मदत व पुनर्वसन राज्यमंत्री आशिष जयस्वाल ही तीन नावे सध्या चर्चेत आहेत.
देवेंद्र फडणवीस यापूर्वी मुख्यमंत्री असताना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र या वेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्विकारण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे ते भंडाऱ्यासाठी उत्सुक नसल्याचे दिसत आहे. विद्यमान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेही नाव सध्या भंडाऱ्यासाठी चर्चेत आहे. यापूर्वी मंत्रीमंडळात असताना त्यांनी भंडाऱ्याचे पालकमंत्रीपद भुषविले आहे. त्यांना भंडाऱ्याची जाण असल्याने त्यांच्याकडे हे पद जाईल, असा अंदाज बांधला जात आहे. मात्र त्यांच्या नावाची चर्चा नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऐकावयास येत आहे.
राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचेही नाव भंडाऱ्यासाठी घेतले जात आहे. संपर्काच्या दृष्टीने त्यांना भंडारा सोईचा असल्याने प्रशासनावर आणि स्थानिक राजकारणावर पकड राहील, असा त्यांच्या नावामागील हेतू आहे. मात्र घोषणा होईपर्यंत हे अंदाज सुरूच राहणार आहेत. नवे वर्ष उगवण्यापूर्वी जिल्हा पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
जयस्वालांची शक्यता अधिक?
वित्त नियोजन, कृषी मदत व पुनर्वसन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या नावाची भंडारा जिल्हा पालकमंत्री म्हणून घोषणा होण्याची शक्यता अधिक आहे. राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या चर्चेत असलेल्या तीन नावांपैकी या नावाची चर्चा अधिक आहे. स्थानिक स्तरावरून या नावाला विरोध झालाच तर, विदर्भाबाहेरील मंत्री येथे पालकमंत्री म्हणून येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
मंत्रीपद हुकले, पुन्हा पार्सल पालकमंत्रीच !
मंत्रीमंडळामध्ये भंडारा जिल्ह्याला स्थान मिळाले नाही. त्यामुळे स्थानिक पालकमंत्री होण्याची आशा पार मावळली आहे. त्यामुळे बाहेरील व्यक्तीच पुन्हा पालकमंत्री होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, दोन दशकानंतरही स्थानिक पालकमंत्री मिळण्याची जिल्ह्याची अपेक्षा कायमच राहणार आहे.