मोहाडी तालुक्यात अवकाळी पाऊस तरीही प्रशासन म्हणते नुकसानच नाही ! शेतकरी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 14:35 IST2025-05-08T14:33:40+5:302025-05-08T14:35:18+5:30

प्रशासनाचा जावईशोध : मदत मिळणार की नाही? बळीराजा चिंतेत

Unseasonal rain in Mohadi taluka, but administration says no damage! Farmers worried | मोहाडी तालुक्यात अवकाळी पाऊस तरीही प्रशासन म्हणते नुकसानच नाही ! शेतकरी चिंतेत

Unseasonal rain in Mohadi taluka, but administration says no damage! Farmers worried

संजय मते 
लोकमत न्यूज नेटवर्क
आंधळगाव :
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली आहे. धान परिपक्व होऊन कापणी व मळणीच्या दिवसात आले आहे; परंतु १ मे ते ५ मे दरम्यान झालेल्या वादळी वारा व पावसामुळे बरेच परिपक्व झालेले धानपीक हे जमीनदोस्त झाले. नुकसान झालेल्या धान शेतीचे पंचनामे करून आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत असताना नुकसानीचा प्राथमिक नजर अंदाजाच्या अहवालानुसार मोहाडी तालुक्यात एक हेक्टरवरही नुकसान नाही असे दर्शविण्यात आले आहे.


मोहाडी तालुक्यात ९३९० हेक्टरवर उन्हाळी धान व इतर पिकांची लागवड केली आहे. यामध्ये सर्वात जास्त क्षेत्र हे उन्हाळी धान पीक लागवडीचे आहे. धानपीक हे कापणी व मळणीच्या अवस्थेत असताना निसर्गाने पुन्हा शेतकऱ्यांचा घात केला.


१ ते ५ मे दरम्यान झालेल्या सततच्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे धान पीक हे पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. धान लागवडीसाठी शेतकऱ्यांनी एकरी २५ ते ३० हजारांचा खर्च केला आहे; परंतु हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. जमीनदोस्त झालेल्या धानामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार हे मात्र निश्चित. तरीही नुकसान नाही, असे म्हटले जात असल्याने चिंता वाढली आहे.


५ दिवस सलग पडला अवकाळी पाऊस
तहसील कार्यालयामार्फत प्रत्येक गावासाठी स्वतंत्र नेमणूक झाली आहे. नुकसानीची प्राथमिक आकडेवारी देताना यंत्रणेला नुकसान दिसत नाही का, असा सवाल आता शेतकरी करीत आहेत.


"अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक नजर अंदाजाचा अहवाल सादर करण्यासंबंधीच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. संबंधित कर्मचाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार माहिती वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात आली."
- एस. एन. भडके, प्रभारी, तालुका कृषी अधिकारी मोहाडी

Web Title: Unseasonal rain in Mohadi taluka, but administration says no damage! Farmers worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.