अभिषेकच्या हत्येप्रकरणात पुन्हा दोघांना अटक; अटकेतील आरोपींची संख्या सातवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 14:57 IST2023-08-24T14:55:30+5:302023-08-24T14:57:31+5:30
सुरक्षेचा उपाय म्हणून गणेशपूर भागात गस्त वाढविली

अभिषेकच्या हत्येप्रकरणात पुन्हा दोघांना अटक; अटकेतील आरोपींची संख्या सातवर
भंडारा : भंडारा शहरातील अभिषेक कटकवार (२५) याच्या खुनातील दोन फरार आरोपी मोन्या उर्फ मोनार शेंडे व तेजस घोडीचोर (दोघेही रा. गणेशपूर) यांना मंगळवारी रात्री भंडारा पोलिसांनी अटक केली. यामुळे आता अटकेतील आरोपींची संख्या सातवर गेली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी चिराग गजभिये, पराग सुखदेव, लुकेश उर्फ लुक्का जोड, श्याम उके, सागर भुरे या पाच आरोपींना अटक केली होती. अभिषेक आणि त्याचा लहान भाऊ अरमान कटकवार हे २१ ऑगस्टच्या रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत बाहेर असताना, १५ दिवसांपूर्वीच्या जुन्या वादातून चाकू, विटा, दगड अशा शस्त्रांनी वार करून त्याची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडात आणखी कुणाचा समावेश आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत.
अभिषेकवर अंत्यसंस्कार
दरम्यान, शवविच्छेदनानंतर अभिषेकच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने त्याचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. त्याच्या खुनाबद्दल उपस्थितांमध्ये रोष व्यक्त होत होता. दरम्यान, पोलिसांनी आरोपींना पकडून आणले असता, मोठी गर्दी झाली होती. पोलिसांना ती पांगवावी लागली.
गस्त वाढविली
या हत्याकांडानंतर पोलिसांनी सुरक्षेचा उपाय म्हणून गणेशपूर भागात गस्त वाढविली आहे. मंगळवारी रात्री पोलिसांची ड्युटी या मार्गावर लावली होती. या हत्याकांडातून भविष्यात टोळीयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.