टिप्परने दाम्पत्याला चिरडले, भीषण अपघातात पती-पत्नी जागीच ठार
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: August 27, 2023 20:06 IST2023-08-27T20:04:14+5:302023-08-27T20:06:17+5:30
तुमसरजवळच्या खरबी येथील घटना : नागरिकांचा संताप अनावर

टिप्परने दाम्पत्याला चिरडले, भीषण अपघातात पती-पत्नी जागीच ठार
भंडारा : नातेवाईकाशी रस्त्याच्या बाजूला बोलत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिप्परने एका दाम्पत्याला अक्षरश: चिरडले. बालचंद ठोंबरे (५५), व त्यांची पत्नी अनिता ठोंबरे (५२) रा. सोनोली ता. मोहाडी हल्ली मुक्काम स्टेशन टोली, देव्हाडी असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास तुमसर- भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील खरबी येथे घडली.
अपघातानंतर संतप्त झालेले नातेवाईक व नागरिकांनी रास्त रोकाे करीत मृतदेह उचलण्यास नकार दिला. यावेळी तणाव निर्माण झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. बालचंद ठोंबरे व त्यांची पत्नी अनिता हे दाम्पत्य मुलगी व जावयाला भेटण्याकरिता गेले होते. स्टेशनटोली ( दे.) येथे दुचाकीने परत येताना खरबी शिवारात रस्त्याच्या कडेला ते थांबले. त्याचवेळी तिथे असलेल्या नातेवाईकांशी बोलत असताना विरुद्ध दिशेने येणारा भरधाव टिप्परने त्यांना अक्षरश: चिरडले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी घटनास्थळी घटनास्थळी आमदार राजू कारेमोरे व माजी आमदार चरण वाघमारे यांनी भेट देत नागरिकांची समजूत काढली. यावेळी तुमसर व मोहाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते. तब्बल दीड तासानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. बालचंद ठोंबरे हे तुमसर रोड येथे रेल्वेत कार्यरत होते. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. तपास मोहाडी पोलिस करीत आहेत.