सात महिन्यांपासून बोरगाव येथील पाणीपुरवठा योजना ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 13:38 IST2024-09-20T13:36:59+5:302024-09-20T13:38:19+5:30
Bhandara : हर घर नल, हर घर जल या योजनेचा पूर्णतः फज्जा उडाल्याचे चित्र

The water supply scheme in Borgaon has been stopped for seven months
लोकमत न्यूज नेटवर्क
सिल्ली : तालुक्यातील बोरगाव बुज. पुनर्वसन येथील गावकऱ्यांना शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल दोन कोटी एकोणऐंशी लक्ष बावन्न हजार रुपये खर्च करण्यात आले. पाण्याच्या टाकीजवळ सोलर पॅनल लावण्यात आले. घरच्या नळाला पाणी आज येईल, उद्या येईल, अशी गावकऱ्यांना आशा होती. मात्र मागील सात महिन्यांपासून गावातील ग्रामीण पाणीपुरवठा योजना ठप्प असून गावकऱ्यांच्या घरगुती नळाला पाणी आलेच नाही. त्यामुळे हर घर नल, हर घर जल या योजनेचा पूर्णतः फज्जा उडाल्याचे बोरगाव येथे चित्र आहे.
नागरिकांना या पाणीपुरवठा योजनेचा कोणताही लाभ झाला नसल्याने नाइलाजास्तव इतरत्र असलेल्या गढूळ पाण्याचे स्रोत शोधावे लागत असून शुद्ध पाण्याविना नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. देशातील बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागामधे राहते. ग्रामीण भागातील जनतेस शुद्ध व स्वच्छ आरोग्यदायी पाणीपुरवठा करणे सरकारचा मुख्य उद्देश आहे.
शासनाच्या धोरणानुसार ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीस ४० लीटर पाणी दरदिवशी दरमाणशी आवश्यक आहे. मात्र बोरगाव येथील टाकीतून एक थेंबही पाणी घरगुती नळाला येत नाही. ग्रामीण जनतेला पिण्याचे पाणी व आरोग्याच्या बाबीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून नळाला शुद्ध पाणी द्यायचे नव्हते तर लाखो रुपयांचा चुराडा का केला, अशी गावकऱ्यांची प्रतिक्रिया आहे.
लक्ष देणार काय?
सात महिन्यांपासून पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या पाठपुराव्याची गरज आहे