न्यास चाचणी परीक्षेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 11:53 IST2024-12-04T11:51:31+5:302024-12-04T11:53:07+5:30
सीईओंची आकस्मिक भेट : बेटाळा शाळेतील प्रकार

The quality of students has deteriorated in the trust test
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी: नॅशनल अचिवमेंट सर्वे (NAS) यातून सर्वसमावेशक शैक्षणिक मूल्यांकन करण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये राष्ट्रीय संपादन सर्वेक्षण चाचणी घेण्यात आली. या अंतर्गत बेटाळा जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी आकस्मित भेट दिली. त्यात राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळली असल्याचे चित्र दिसून आले.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी ३० नोव्हेंबर रोजी घेण्यात आली होती. जिल्हा परिषद निधीमधून सर्व शाळांना चाचणींचे पेपर पूर्ण झाले होते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व शैक्षणिक क्षमता स्तर पाहण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रवींद्र सोनटक्के यांनी मोहाडी तालुक्यातील काही शाळांना आकस्मित भेटी दिल्या. जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा बेटाळा येथील शाळेला भेट देताना परिपाठ सुरू होता. परिपाठ अतिशय चांगला होता. त्याचे कौतुकही कुर्तकोटी यांनी केले.
त्यानंतर राष्ट्रीय संपादणूक चाचणी झालेल्या पेपरच्या ओएमआर शीटचे परीक्षण केले. परीक्षणानंतर वर्गात विद्यार्थ्यांशी चाचणी झालेल्या प्रश्नपत्रिकांवर केली चर्चा केली. विद्यार्थ्यांकडून चाचणी संदर्भात माहिती काढून घेतली. चाचणी व विद्यार्थ्यांसोबत झालेल्या संवादात त्यांना बराच फरक दिसून आला. तथापि शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता समाधानकारक असल्याचे कुर्तकोटी यांना दिसून आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी मनीषा गजभिये, गटविकास अधिकारी दिनेश हरीणखेडे, शिक्षण विस्तार अधिकारी शरद कुकडकर उपस्थित होते.
शिक्षकांना खडसावले
या प्रकारानंतर समीर कुर्तकोटी यांनी शाळेतील येथील मुख्याध्यापक व शिक्षकांची संयुक्त्त सभा घेतली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल असमाधान व्यक्त करून शिक्षकांची कानउघडणी केली. यापुढे चांगले काम कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. दैनंदिन विस्तारपूर्वक टाचण काढा, शैक्षणिक साहित्यांच्या वापर करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
पुन्हा चाचणी परीक्षा घ्या
येथील शिक्षकांनी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणीच्या धर्तीवर पंधरा दिवसांनी सराव चाचणी परीक्षा आयोजित करावी. विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासावी. त्यानंतरही विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारली नाही, तर शिक्षकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्य कार्यपालन अधिकारी कुर्तकोटी यांनी दिला.