मनाजोगे उत्पन्न आले नाही म्हणत मनोरुग्ण शेतकऱ्याने घेतला गळफास
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: November 17, 2023 14:56 IST2023-11-17T14:55:17+5:302023-11-17T14:56:15+5:30
लिंबाच्या झाडाला गळफास लागलेल्या अवस्थेत आढळला

मनाजोगे उत्पन्न आले नाही म्हणत मनोरुग्ण शेतकऱ्याने घेतला गळफास
भंडारा : शेतीमधून बरोबर उत्पन्न निघाले नाही. असे म्हणत पवनी तालुक्यातील खापरी (पुनर्वसन) येथील शेतकऱ्याने शेतातील कडूलिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १७ नोव्हेंबरला उघडकीस आली. भगवान विठोबा रामटेके (४५, खापरी पुनर्वसन) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मागील पाच वर्षापासून हा शेतकरी मनोरुग्ण होता, अशी माहिती आहे. यावर्षी त्याच्या शेतामधून कमी उत्पन्न आले होते. यामुळे तो निराश होता. याच मनस्थितीत तो १६ नोव्हेंबरला सकाळी ५.३० वाजता सकाळी घरून निघून गेला. त्यानंतर त्याचा शोध घेतला पण तो दिसला नाही. १७ ला त्याचा मृतदेह शेतात बांधावर लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास लागलेल्या अवस्थेत आढळला. मुलगा शुभम रामटेके यांच्या तक्रारीवरून अड्याळ पोलिसांनी कलम १७४ अन्वये गुन्ह्याची नोंद केली. पुढील तपास सहायक फौजदार सुभाष मस्के करीत आहे.