एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली ! मागणी पूर्ण न झाल्यास ७ जुलैला आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 15:35 IST2025-07-04T15:35:02+5:302025-07-04T15:35:45+5:30
Bhandara : प्रकरण शेतकऱ्यांना १२ तास वीज पुरवठ्याचे

The health of a hunger striker has deteriorated! Warning of agitation on July 7 if the demand is not met
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी/पालोरा : जांभोरा, करडी, पालोरा, कोका परिसरातील शेतकऱ्यांना १६ ते १२ तास कृषी वीजपुरवठा मिळावा याकरिता करडी वीज वितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली. शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. तीन दिवसात मागणी पूर्ण झाली नाही तर ७ जुलै रोजी वीज वितरण कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
आज उपोषण स्थळी शरदचंद्र पवार गटाचे भंडारा जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी भेट देऊन आमरण उपोषणाला पाठिंबा दिला आहे. करडी जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य महादेव पचघरे यांनी वीज वितरण विभागाचे उपविभागीय अधिकारी गजानन जयस्वाल यांना बोलवून १२ तास कृषी वीजपुरवठा देण्याची मागणी केली असता गजानन जयस्वाल यांनी उपोषण स्थळी भेट दिली.
जिल्हा परिषद सदस्य महादेव पचघरे यांनी आमदार राजू कारेमोरे यांचे प्रतिनिधी म्हणून उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याची मागणी केली. लवकरच प्रश्न मार्गी लागणार आहे, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. पांडुरंग मुंगमोडे यांची प्रकृती खालावली असल्याने डॉ. सोनवने यांनी उपचार करून सलाईन लावली. आंदोलनात सहभागींची संख्या वाढणार असल्याचे सांगण्यात आले.
आता पावसाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनात एखादा प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या समस्या बाबतीत अधिवेशनात प्रश्न मांडतील काय? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी याच ठिकाणी शेतकऱ्यांकडून बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले होते. दरम्यान लेखी लिहून दिले होते की, १२ तास वीज देण्यात येईल. मोहाडी वीज वितरण विभाग अभियंता सुनील मोहुर्ले यांना विचारले असता, वरिष्ठांच्या बोलण्यावरून तेव्हा आश्वासन दिले, त्यामुळे माझी चूक झाली, अशी कबुली मोहुर्ले यांनी दिली.
"करडी येथील आमरण उपोषणाला खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी उपोषणकर्त्यांना भेटून समस्या जाणून घेतली. वीज वितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत १२ तास वीज देण्यासंबंधी चर्चा केली असता वरिष्ठांकडून प्रश्न मार्गी लागला नाही. शासनाने तत्काळ उपोषणकर्त्यांची मागणी मंजूर करावी. शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नये. वेळ पडल्यास रस्त्यावरही उतरू."
- डॉ. प्रशांत पडोळे, खासदार.