अहमदाबाद-हावडा धावत्या एक्सप्रेसवर अज्ञाताकडून दगडफेक, वातानुकूलित कोचच्या काचा फुटल्या
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: August 30, 2023 17:28 IST2023-08-30T17:26:22+5:302023-08-30T17:28:18+5:30
सुदैवाने प्रवासी थोडक्यात बचावले

अहमदाबाद-हावडा धावत्या एक्सप्रेसवर अज्ञाताकडून दगडफेक, वातानुकूलित कोचच्या काचा फुटल्या
भंडारा : अहमदाबाद- हावडा धावत्या एक्सप्रेसवर अज्ञातांनी दगडफेक केली. त्यात वातानुकूलित बी-३ च्या काचा कुठल्या सुदैवाने प्रवाशांना कुठलीही इजा झाली नाही. या घटनेने प्रवाशी भयभीत झाले होते. ही घटना तुमसर रोड ते तिरोडा रेल्वे स्थानकादरम्यान २८ ऑगस्टच्या रात्री ९ वाजता घडली.
दोन दिवसांपूर्वी घडलेली ही घटना रेल्वे सुरक्षा बलाने दडवून ठेवली असली तरी बुधवारी चर्चेत आली. नागपूर रेल्वे मंडळ अंतर्गत तुमसर ते तिरोडा रेल्वे स्थानकादरम्यान अहमदाबाद हावडा या प्रवासी एक्सप्रेस रेल्वे गाडीवर काही अज्ञाताने दगडफेक केली. वातानुकूलित कोच बी-३ मधील बैठक क्रमांक ४१-४८ खिडकीच्या काचा फुटल्या. त्यानंतर धावत्या प्रवासी रेल्वे गाडीत एकच खळबळ माजली या प्रवासी कोचमधील प्रवाशात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेची माहिती रेल्वे जीआरपी व रेल्वेच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. तिरोडा रेल्वे स्थानकावर अहमदाबाद- हावडा एक्सप्रेस पोहोचल्यानंतर सदर दगडफेकीचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर अहमदाबाद हावडा एक्सप्रेस पुढील प्रवासाकरिता सोडण्यात या घटनेचा तपास जीआरपी करीत आहे. यापूर्वी अशी दगडफेक नागपूर मंडळात कुठेही झाली नव्हती. त्यामुळे या घटनेची गांभीर्याने दखल नागपूर रेल्वे मंडळातील विभागीय रेल्वे महाव्यवस्थापक व इतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आहे. सदर दगडफेकीचा अहवाल बिलासपूर येथील रेल्वे महाव्यवस्थापक व दिल्ली येथील रेल्वे बोर्डाने मागितल्याची माहिती आहे.