मामा-भाचीची भेट ठरली अखेरची; सहा वर्षीय बालिका ट्रॅक्टरखाली चिरडून ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 15:30 IST2022-05-26T14:52:59+5:302022-05-26T15:30:40+5:30
मामाच्या घराजवळ असलेल्या किराणा दुकानात कुल्फी आणण्यासाठी ती जात होती. त्यावेळी ट्रॅक्टर मागे घेत असताना ती चाकाखाली आली.

मामा-भाचीची भेट ठरली अखेरची; सहा वर्षीय बालिका ट्रॅक्टरखाली चिरडून ठार
साकोली (भंडारा) : मामाच्या गावी गेलेली तालुक्यातील शिवनटोला येथील सहा वर्षीय बालिका ट्रॅक्टरखाली चिरडून ठार झाल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यातील बोळदे येथे मंगळवारी घडली. बुधवारी शिवनटोला येथे बालिकेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रत्येकजण हळहळत होता.
प्रगती प्रकाश पर्वते (६, रा. शिवनटोला, ता. साकोली) असे मृत बालिकेचे नाव आहे. गत आठवड्यात ती शिवनटोला येथून मामाच्या गावी बोळदे (जि. गडचिरोली) येथे आईसाेबत गेली होती. मामाच्या घराजवळ असलेल्या किराणा दुकानात कुल्फी आणण्यासाठी ती जात होती. त्यावेळी ट्रॅक्टर मागे घेत असताना ती चाकाखाली आली. ट्रॅक्टरचे मागील चाक डोक्यावरून गेले.
या अपघाताची माहिती मिळताच आजोबांसह गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, प्रगतीचा जागीच मृत्यू झाला होता. बुधवारी शिवनटोला येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई-वडील व एक लहान भाऊ आहे. प्रगतीचे यंदा पहिल्या वर्गात नाव नोंदविल्याचे सांगण्यात आले. तिच्या मृत्यूने कुटुंबियांवर मोठा आघात झाला असून, संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.