भंडाऱ्यात दोन अपघातांत सहा जखमी : एका कुटुंबावर काळाचा घाला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 15:28 IST2025-08-12T15:26:27+5:302025-08-12T15:28:18+5:30
साकोली आणि वरठीजवळ घडल्या दोन घटना : सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

Six injured in two accidents in Bhandara: Time's attack on a family!
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये ६ जण जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. विशेष म्हणजे, यात एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे, तर अन्य अपघातांमध्ये दोन दुचाकीचालक गंभीर जखमी झाले आहे. यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मुंडीपार (सडक) गावाजवळ कार-दुचाकी अपघातामध्ये पती-पत्नीसह दोन मुले गंभीर जखमी झालीत, तर दुसऱ्या घटनेत वरठीजवळील सॅनफ्लॅग बायपास पुलावर कारची दोन दुचाकीस्वारांना धडक बसल्याने दोघेही जखमी झाले.
साकोली प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातून जाणाऱ्या ५३ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावरील मुंडीपार (सडक) गावाजवळ कार व दुचाकीत भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीसह दोन लहान मुले असे चौघेही गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी दुपारी १२:३० वाजताच्या दरम्यान घडली. जखमींवर साकोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नागपूरवरून रायपूरकडे जात असलेल्या सीजी १२ बीई ८१६१ क्रमांकाच्या कारने याच मार्गावरून जाणाऱ्या दुचाकीला (एमएच ४० एएस ४४६८) जोरदार धडक दिली. या दुचाकीवरून आई, वडील आणि दोन लहान मुली प्रवास करत होते. धडक बसल्याने चौघेही गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच शिवसेना तालुकाप्रमुख राधेश्याम मुंगमोडे, नरेंद्र वाडीभस्मे, युवासेनेचे पुष्कर करंजेकर व रितिक तिडके यांनी धाव घेतली. त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मदतीचे कौतुक
या अपघाताची माहिती मिळताच साकोली उपतालुका प्रमुख सचिन घोनमोडे यांनी सर्व जखमींना साकोली रुग्णालयात पोहोचवून वैद्यकीय मदत मिळवून दिली. साकोली पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून तपास पोलिस निरीक्षक आचरेकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
वरठी उड्डाणपुलावर कारने दोन दुचाकीस्वारांना उडविले
अपघाताची दुसरी घटना वरठीजवळील सॅनफ्लॅग बायपास पुलावर घडली. या पुलावरून येणाऱ्या भरधाव कारने दोन दुचाकीस्वरांना जोरदार धडक दिली. यात पोलिस कर्मचाऱ्याचा पाय, तर दुसऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हा अपघात सोमवारी, सायंकाळी ४:४० वाजताच्या दरम्यान घडला. भंडारा पोलिस मुख्यालयात कार्यरत चंदन चकोले (वय ३५) हे भंडाराकडे, तर भंडारा येथील हेमंत धार्मिक (३६) हे मोहाडीच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. दरम्यान, सॅनफ्लॅग बायपास पुलावरून भंडाराच्या दिशेने जाणारी मारुती व्हॅन अनियंत्रित होऊन दोन्ही दुचाकींना एकाच वेळी धडक बसली. यात पोलिस कर्मचाऱ्याच्या पायाला व धार्मिक यांच्या डोक्याला जबर मार लागला. जखमींना पोलिसांनी तत्काळ भंडारा रुग्णालयात खाना करण्यात आले.
बायपास रस्ता ठरतोय मृत्यू मार्ग
सॅनफ्लॅग कंपनी ते पाचगाव फाटा हे ५०० मीटरचे अंतर वाहन चालकांचा कर्दनकाळ ठरला आहे. पुलावरून चढताना असलेले असंख्य चढउतार व रस्त्याचा भाग समतोल नसल्याने अपघातात वाढ झाली आहे. रहदारीचा एकमेव व वर्दळीच्या रस्त्याची खराब हालत वाहन चालकांकरिता मृत्युमार्ग ठरली आहे.