अधिकाऱ्यांवर हल्ल्यानंतरही तस्करांचे चांगभले; रेतीची अवैध वाहतूक सर्वसामान्यांच्या जिवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2022 12:48 IST2022-05-03T12:43:29+5:302022-05-03T12:48:19+5:30
१ ते २ घाट वगळता जिल्ह्यातील बहुतांश रेतीघाटातून चोरीछुपे मार्गाने रेतीची वाहतूक सुरूच आहे. टाॅप टू बाॅटम सेटिंगचा हा कारनामा जनसामान्यांच्या जिवावर बेतत आहे.

अधिकाऱ्यांवर हल्ल्यानंतरही तस्करांचे चांगभले; रेतीची अवैध वाहतूक सर्वसामान्यांच्या जिवावर
भंडारा : पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्याला रेती या गौण खनिजांचे वरदान लाभले आहे. मात्र, या वरदानाचा फायदा शासनाला कमी तर रेती माफियांना अधिक होताना सध्या तरी दिसून येत आहे. बहुतांश रेतीघाट लिलाव झाले नसल्याने व कारवाईसाठी तत्परता दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांवर जीवघेण्या हल्ल्यानंतरही रेती तस्करांचे चांगभले होत आहे.
सहा दिवसांपूर्वी भंडाऱ्याच्या एसडीओंवर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात एसडीओ थोडक्यात बचावले. मात्र, राजपत्रीत अधिकाऱ्यांचा जीव घेण्याइतपत रेतीतस्करांची मजल जात असेल, तर प्रशासन आहे तरी कुठे असा सवाल आपसुकच निर्माण होतो. कोट्यवधींची माया अल्पावधीत मिळवून देणारा धंदा म्हणजे रेती तस्करी होय. यात कुणाच्याही जिवाची पर्वा न करता आपले चांगभले कसे करता येईल याचाच रेती माफिया विचार करीत असतात.
गत दोन वर्षांच्या आकडेवारीवरून नजर घातल्यास माफियांनी सामान्य नागरिक तर सोडाच महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली आहे. १ ते २ घाट वगळता जिल्ह्यातील बहुतांश रेतीघाटातून चोरीछुपे मार्गाने रेतीची वाहतूक सुरूच आहे. टाॅप टू बाॅटम सेटिंगचा हा कारनामा जनसामान्यांच्या जिवावर बेतत आहे.
आज सोमवारी सकाळी मोहदुरा - सातोना रस्त्यावर अपघातात मायलेकाचा करुण अंत झाला. भरधाव धावणाऱ्या रेतीच्या टिप्परने या निष्पाप मायलेकाचा बळी घेतला. घटनास्थळावरील दृश्य बघण्यासारखे नव्हते. नेहमीप्रमाणे ही घटना घडली असा विचार करून सर्वच जण शांत बसतील यात आता शंका उरली नाही.
हिस्सा पोहोचणे महत्त्वाचे
रेतीची तस्करी हा विषय जिल्ह्यासाठी नवीन नाही. मात्र, त्यावर आळा घालण्यासाठी प्रशासन गंभीर का होत नाही हा महत्त्वाचा विषय आहे. एखादे प्रकरण तापलेच तर हिस्सा कधी व कुणाला पोहोचवावा याची गंभीर दखल घेतली जाते. त्यानंतर सर्व आलबेल होते.