भंडाऱ्यात ३ कोटींचा रेती घोटाळा : आठ टिप्पर जप्त, दोन पसार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 12:27 IST2025-05-31T12:27:13+5:302025-05-31T12:27:56+5:30

जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांची थेट कारवाई : रेती माफियांना झटका!

Sand scam of Rs 3 crore in Bhandara: Eight tipsters seized, two absconding! | भंडाऱ्यात ३ कोटींचा रेती घोटाळा : आठ टिप्पर जप्त, दोन पसार!

Sand scam of Rs 3 crore in Bhandara: Eight tipsters seized, two absconding!

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
मोहाडी तालुक्यातील बेटाळा रेतीघाट डेपोवरून रेतीचे अवैध उत्खनन करून ती टिप्परमधून नागपूरकडे गोपीवाडामार्गे घेऊन जाणाऱ्या वाहनांना वाटेतच अडवून महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. यात रेतीचे आठ टिप्पर पकडले. या कारवाईमध्ये ३ कोटी २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते व पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी स्वतः हजर राहून ही कारवाई गुरूवारी रात्री ८ वाजता केली. अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.


तुमसर व मोहाडी तालुक्यातील रेती घाटांतून मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन केले जात आहे. ही चोरीची रेती नागपूरला रोज टिप्परमधून नेली जाते. राष्ट्रीय महामार्गावरून न जाता शहापूर जवळील गोपीवाडा, सातोना मार्गाने नागपूरकडे ही वाहने जातात. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. गुरुवारी रात्री मोठ्या संख्येने टिप्पर रेती घेऊन नागपूरकडे निघाल्याची गोपनीय माहितीवरून महसूल व पोलिसांच्या संयुक्त पथकाने धाड घातली. 


दोन टिप्पर पसार
यातील दोन टिप्परचालकांनी जवळच्या नाल्यात रेती रिकामी करून नागपूरकडे पळ काढला. पथकाच्या हे लक्षात आल्यावर त्यांचा पाठलाग करण्यात आला, मात्र ते हाती लागले नाहीत. पसार झालेल्या टिप्परची संख्या दोनपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे.


या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२), ४९, ३(५), सहकलम ४८ (७) (८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ सहकलम ७,९,१५ पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. घटनास्थळाहून सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे.


रात्री ८ वाजता सुरू झालेली ही कारवाई तब्बल तीन तास चालली. रात्री ११ वाजता सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या मोहिमेत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, जवाहरनगरचे ठाणेदार, एलसीबीचे पथक असे ५० पेक्षा अधिक कर्मचारी-अधिकारी सहभागी होते.


या टिप्परवर झाली कारवाई
कारवाई करण्यात आलेल्या टिप्परमध्ये क्रमांक एमएच ४०/बीएफ ९१३० (चालक लक्ष्मीचंद लेंडे, ३३, रोहा बेटाळा), टीएस ०३/यूडी १०९९ (चालक प्रवीण पुरी, ३२, देवाडा बु.), एमएच ४०/सीटी ९१३० (तिन्ही मालक नितीन उर्फ मोनू गणवीर, दाभा), एमएच ३६/एए ९४५२ (चालक प्रशांत मारबते, मालक प्रदीप कांबळे, टाकळी), एमएच ४०/सीटी ८६३४ (मालक प्रवीण गणवीर, दाबा), एमएच ४०/सीएम ९४५२ (चालक मुन्ना भोयर, २७, डोडमाझरी, मालक प्रदीप कांबळे, टाकळी), एमएच ३६/एबी ३५३४ (चालक मुकेश गाढवे, ३०, रोहा, मालक अजिंक्य गोमासे, मुंढरी), एमएम ३६/एए ४३७७ (चालक पसार)

Web Title: Sand scam of Rs 3 crore in Bhandara: Eight tipsters seized, two absconding!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.