Maharashtra Election 2019 : परिणय फुके यांच्या भावाचे अपहरण करून मारहाण; नाना पटोले यांच्या गुंडांचे कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 06:32 IST2019-10-19T02:25:46+5:302019-10-19T06:32:52+5:30
नाना पटोले यांचा पुतण्या रिकी पटोले व काही गुंडांचे कृत्य Maharashtra Election 2019

Maharashtra Election 2019 : परिणय फुके यांच्या भावाचे अपहरण करून मारहाण; नाना पटोले यांच्या गुंडांचे कृत्य
भंडारा - भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि साकोली विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांच्या भावाचे अपहरण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या गुंडांनी केल्याची घटना शुक्रवारी रात्री साकोली येथे घडली. लोकसभेवेळी पटोले नितीन गडकरी यांच्याविरोधात उभे राहिले होते.
या घटनेबाबत थोडक्यात माहिती अशी की, डॉ. परिणय फुके यांचे लहान बंधू नितीन फुके हे प्रकाशपर्व पोस्ट ऑफिस जवळ साकोली या त्यांच्या राहत्या घरातून रस्त्याने जात असताना नाना पटोले यांचा पुतण्या रिकी पटोले व काही गुंडांनी नितीन यांना घेरले आणि मारहाण करीत वाहनात कोंबले. तेथून हे गुंड नितीन यांना पटोले यांच्या कार्यालयात घेऊन गेले आणि तिथेही त्यांना जबर मारहाण केली. या हल्ल्यात नितीन हे गंभीर जखमी झाले असून त्यांना साकोली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
पालकमंत्र्यांनाच जीवे मारण्याचा होता डाव :
पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांचे अपहरण करून त्यांनाच जीवे मारण्याचा डाव नाना पटोले यांच्या गुंडांनी रचला होता, अशी धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. रस्त्याने पायी जात असलेल्या नितीन फुके यांनाच पटोले यांच्या गुंडांनी अंधारात पालकमंत्री समजून घेरले आणि जबर मारहाण केली. याप्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती.