एकच शिष्यवृत्ती फॉर्म वर्षातून तीनदा भरण्याचे आदेश; शिष्यवृत्तीचा घोळ संपता संपेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 14:00 IST2025-03-26T13:58:15+5:302025-03-26T14:00:45+5:30

Bhandara : मंजूरीसाठी विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांची होतेय दमछाक

Order to fill the same scholarship form three times a year; Scholarship confusion never ends | एकच शिष्यवृत्ती फॉर्म वर्षातून तीनदा भरण्याचे आदेश; शिष्यवृत्तीचा घोळ संपता संपेना

Order to fill the same scholarship form three times a year; Scholarship confusion never ends

विलास खोब्रागडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
सिल्ली (आंबाडी) :
जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना देय असलेल्या वार्षिक शिष्यवृत्तीची देयके आधी ऑनलाइन, मग ऑफलाइन, आता पुन्हा ऑफलाइन असा एकच शिष्यवृत्ती फॉर्म वर्षातून तीनदा भरून सादर करण्याचे आदेश आले. त्यामुळे एकच काम वारंवार करताना शिक्षकांची डोकेदुखी वाढली असून, आर्थिक वर्ष संपत असतानादेखील शालेय शिष्यवृत्तीचा घोळ संपता संपेना, अशी शालेय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची दयनीय अवस्था झाली आहे.


जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण फी व परीक्षा फी, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकारची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती आदी शिष्यवृत्तीची देयके योग्य प्रस्ताव सादर केले जातात.


आधी ऑफलाइन देयके
सन २०२४-२५ मध्ये शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे संवर्गनिहाय प्रपत्र, एपीपी-१८, बँकेचे तपशील, शाळा मान्यता प्रत, मुख्याध्यापक नमुना स्वाक्षरी प्रत, मागील शिष्यवृत्ती वाटप पावती, उत्पन्न दाखले, जातींचे प्रमाणपत्र आदींसह ऑफलाइन शिष्यवृत्ती देयके शाळांनी सादर केले.


ऑनलाइन शिष्यवृत्तीचे काम केले पूर्ण
एका महिन्यातच ऑफलाइन शिष्यवृत्तीची देयके रद्द करून नवीन फॉरमॅटमध्ये ऑनलाइन देयके तयार करून नव्याने हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी कार्यालयात जमा करण्याचे आदेश दिले. त्यामुळे शाळांनी धावपळ करून कसे बसे ऑनलाइन शिष्यवृत्तीचे काम पूर्ण केले.


पुन्हा ऑफलाइन
सन २०२४-२५ हे आर्थिक व शैक्षणिक वर्ष संपण्याकरिता अवघा एक आठवडा असताना आता पुन्हा शाळास्तरावरील अनुसूचित जाती मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे ऑफलाइन पद्धतीने पंचायत समिती स्तरावर २४ मार्च पर्यंत जमा सूचना देण्यात आल्या.


ऑनलाइनच्या नादात वाढली डोकेदुखी
जिल्ह्यातील शिक्षक शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि विकास आराखड्याच्या १२८ मानकांची जुळवाजुळव करणे, निपुण भारत उपक्रम राबविणे, उल्लास नवभारत पायाभूत व संख्याज्ञान चाचणीचे नियोजन करणे, यू-डायस पल्स प्रणाली अद्ययावत करणे आदी कामांत व्यस्त आहेत. यात आता शिष्यवृत्तीची देयके पुन्हा ऑफलाइन करण्याचे काम वाढले. त्यामुळे ऑनलाइन, ऑफलाइन शिष्यवृत्तीच्या नादात शिक्षकांची पुन्हा डोकेदुखी वाढली आहे.

Web Title: Order to fill the same scholarship form three times a year; Scholarship confusion never ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.