Lok Sabha Election 2019; भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी अखेर शिवसैनिक उतरले मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 00:57 IST2019-04-07T00:56:35+5:302019-04-07T00:57:23+5:30
भाजपा-शिवसेना युतीत भंडारा-गोंदिया मतदार संघ भाजपाच्या वाट्याला गेला आहे. मातोश्रीवरून आलेल्या युतीधर्माच्या आदेशाचे पालन करीत शिवसैनिक भाजपा उमेदवाराच्या प्रचारात स्वत:ला झोकून देत आहेत.

Lok Sabha Election 2019; भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी अखेर शिवसैनिक उतरले मैदानात
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भाजपा-शिवसेना युतीत भंडारा-गोंदिया मतदार संघ भाजपाच्या वाट्याला गेला आहे. मातोश्रीवरून आलेल्या युतीधर्माच्या आदेशाचे पालन करीत शिवसैनिक भाजपा उमेदवाराच्या प्रचारात स्वत:ला झोकून देत आहेत. सुरुवातीला असलेला समन्वयाचा अभावही आता दूर झाला असून नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिक गावागावात निघणाऱ्या प्रचाररॅलीत आणि सभांमध्येही प्रामुख्याने दिसू लागले आहेत.
भंडारा जिल्ह्यात शिवसेनेचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. २००९ च्या विधानसभा निंवडणुकीत भंडारा येथून शिवसेनेचा आमदारही झाला होता. गावागावात शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सुरुवातीला शिवसेना आणि भाजपा यांच्या समन्वयाचा अभाव दिसत होता. मात्र आता तोही दूर झाला असून ‘हम साथ साथ है’ म्हणत शिवसैनिकही आता प्रचाराला लागले आहेत. शिवसेनेने भंडारा शहरात स्वतंत्र प्रचार कार्यालय उघडले नसले तरी जिल्हा शिवसेनेच्या कार्यालयातूनच प्रचाराची सूत्रे हालत आहेत.
सकाळपासून या ठिकाणी भगवे दुपट्टे घातलेले शिवसैनिक एकत्र होतात. प्रचाराचे नियोजन केले जाते. दिवसभर गावागावात प्रचार करून सायंकाळी पुन्हा ही मंडळी कार्यालयात एकत्र होतात. दिवसभर शुकशुकाट असला तरी सकाळी आणि सायंकाळी शिवसैनिकांची वर्दळ या कार्यालयात दिसून येते. शिवसैनिक एकदिलाने मतदारांशी संवाद साधत प्रचार करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
युतीधर्माच्या आदेशाचे पालन करीत वरिष्ठ पातळीवरील नेतेही सभा आणि प्रचाररॅलीत दिसून येत आहेत. काही ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यात समन्वयाचा थोडा अभाव दिसून येतो. शिवसेनेला फारसे विचारात घेतले जात नसल्याने नाराजी दिसत आहे. मात्र निवडणुकीच्या काळात दोन्ही पक्षाकडून वातावरण अनुकुल असल्याचे दाखविले जाते.
अवघ्या सहा महिन्याने येणाºया विधानसभेच्या निवडणुकीवर डोळा ठेवत शिवसैनिक आता भाजपाच्या प्रचारात जोमाने लागल्याचे दिसत आहेत. वाढत्या उन्हाच्या झळा सोसत शिवसैनिक आपल्या मित्रपक्षासाठी राबताना दिसत आहेत. मनभेद असले तरी प्रचारावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. उशिरा का होईना शिवसैनिक युतीधर्म पाळण्यासाठी मनापासून कामाला लागले.
मित्र पक्षांची मोलाची साथ
कोणताही किंतु परंतु मनात न ठेवता शिवसेना आणि आरपीआयचा आठवले गट आमच्या सोबत प्रचारात मेहनत घेत आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे यासाठी सर्व घटकपक्ष आपल्या सोबत आहे.
-सुनील मेंढे, भाजपा उमेदवार
क्षेत्रनिहाय दौरे करून गावागावांत प्रचार
युती धर्म पाळण्यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच भाजपसोबत आहोत. प्रचाराचे नियोजन करून जिल्हा परिषद क्षेत्र निहाय दौरे करीत आहोत. नेत्यांच्या सभांनाही आम्ही उपस्थित राहत आहोत. गावागावात प्रचार सुरू आहे.
-नरेंद्र भोंडेकर, माजी आमदार, शिवसेना
विधानसभा मतदार संघातील मित्र पक्षाच्या कार्यालयात काय दिसते?
१. भंडारा : शिवसेना जिल्हा कार्यालयात शिवसैनिकांची सकाळपासून वर्दळ दिसून आली. जिल्हा प्रमुखांच्या निर्देशांच्या प्रचाराचे नियोजन सुरु होते.
२. तुमसर : शिवसेना उपजिल्हा प्रमुखाच्या कार्यालयात प्रचाराची सुत्रे हलताना दिसत होती. भाजपाशी समन्वय साधून नियोजन केले जात होते.
३. साकोली : शिवसेनेने स्वतंत्र कार्यालय उघडले नाही. मात्र भाजपाच्या कार्यालयातून प्रचाराच्या कामाला लागत आहेत. भाजपाच्या नियोजनानुसार सहकार्य करतात.
४. गोंदिया : शिवसेनेने स्वतंत्र कार्यालय उघडले असून प्रचाराचे नियोजन करून शिवसैनिक बाहेर पडत असल्याचे दिसून आले. सकाळपासूनच शिवसैनिकांची येथे गर्दी होती.
५. तिरोडा : शिवसेनेचे स्वतंत्र प्रचार कार्यालय नाही. मात्र येथील पदाधिकाऱ्यांच्या घरूनच प्रचाराची धुरा सांभाळली जात आहे. शिवसैनिक येथूनच प्रचारासाठी जातात.
६. अर्जुनी (मोरगाव) : स्वतंत्र प्रचार कार्यालय नसले तरी भाजपाच्या प्रचार कार्यालयातून शिवसैनिक प्रचारासाठी निघतात. भाजपसोबत शिवसैनिकही उत्साहात दिसत होते.