रात्रभर प्रसववेदना, डॉक्टर फिरकले सुद्धा नाहीत; गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 16:12 IST2025-08-21T16:08:29+5:302025-08-21T16:12:04+5:30
Bhandara : लाखांदूरमध्ये वैद्यकीय निष्काळजीपणाची मोठी घटना

Labor pains all night, doctors didn't even come; Pregnant mother and baby die
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघोरी मोठी (भंडारा) : लाखांदूर तालुक्यात पुन्हा एकदा आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाचा बळी एका गरोदर महिलेच्या रूपाने द्यावा लागला. आसोला येथील रीना विवेक शहारे (वय २५) हिला १८ ऑगस्टच्या रात्री प्रसूती वेदना झाल्याने कुटुंबीयांनी लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रात्रभर प्रसववेदनांनी तळमळणाऱ्या या महिलेकडे उपचारासाठी डॉक्टर फिरकले नाहीत. अखेर पहाटे प्रसूती झाली, मात्र त्यानंतर बाळ व प्रवासादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली.
शहारे कुटुंबीयांनी येथील रुग्णसेवेवर गंभीर आरोप केले असून, हा निष्काळजीपणाचा बळी असल्याचे म्हटले आहे. रीनाला १८ ऑगस्टच्या रात्री ९:३० वाजता प्रसववेदना सुरू झाल्याने तिला लाखांदूर रुग्णालयात दाखल केले. मात्र, रात्रभर कोणतेही उपचार मिळाले नाही. त्यानंतर १९ ऑगस्टच्या सकाळी अंदाजे ६:३० वाजण्याच्या सुमारास रीनाची नैसर्गिक प्रसूती झाली. यात मुलाचा जन्म झाला. मात्र, योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्याने बालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर रीनाला तत्काळ भंडारा येथे रेफर करण्यात आले. पण, ज्या रुग्णवाहिकेत नेण्यात आले त्यात ऑक्सिजन सिलिंडर नसल्याने वाटेतच तिचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली असून, जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
कुटुंबीयांचा आक्रोश
रात्री रुग्णालयात भरती केल्यानंतर कोणीही डॉक्टर व परिचारिका फिरकली नाही. आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे आम्ही दोन जीव गमावले, असा संताप विवेक शहारे यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे कर्तव्यात दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचारी, तसेच अधिकारी यांच्यावर तत्काळ निलंबनाची मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांचा संताप उसळला
या घटनेमुळे परिसरात हळहळ पसरली असून, नागरिकांच्या संतप्त भावना आहेत. तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय असूनही योग्य आरोग्य सेवा का मिळत नाही?, असा परखड सवाल जनतेकडून उपस्थित केला जात आहे.
अधिकारी संपर्कात नाहीत
घटनेबाबत माहिती घेण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना पडोळे यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र प्रतिसाद मिळाला नाही.
रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलिंडरच नव्हता
रीनाला तातडीने भंडारा येथे रेफर करण्यात आले. मात्र, रस्त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्या रुग्णवाहिकेत रीनाला नेण्यात आले त्यात ऑक्सिजन सिलिंडर नसल्याने त्याच अवस्थेत नेण्यात आले. मात्र, वाटेतच प्रसूतेचा मृत्यू होणे, ही घटना गंभीर असल्याने संताप व्यक्त होत आहे.