बसमध्ये केवळ जीपीएस लावून कशे चालणार? नागरिकांना बसचे लोकेशन केव्हा कळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 15:53 IST2025-03-10T15:52:45+5:302025-03-10T15:53:43+5:30
सुविधेसाठी प्रतीक्षा : भंडारा विभागातील सहा आगारात ३८१ बसेस आहेत

How will it work with just GPS installed in the bus? When will citizens know the location of the bus?
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्रवाशांना एसटी बसचे लाइव्ह लोकेशन कळावे, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने प्रत्येक बसमध्ये जीपीएस लावण्यात आले आहे; परंतु जीपीएस असतानाही प्रवाशांना अजून तरी बसचे लोकेशन कळत नसल्याचे चित्र आहे. या सुविधेसाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वच बसेसमध्ये नवीन वर्षापासून व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम अॅप्लिकेशनच्या माध्यमातून बस स्थानकात कधी येणार, बिघाड झाल्यास बसला किती वेळ लागणार किंवा निश्चित ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांना किती वेळ लागणार अशी महत्त्वाची माहिती या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना मिळणार होती. जिल्ह्यात भंडारासह साकोली, तुमसर आणि पवनी या चार आगारांचा समावेश आहे. या आगाराअंतर्गत धावणाऱ्या प्रत्येक बसचे प्रवाशांना लाइव्ह लोकेशन कळावे. जेणेकरून प्रवाशांना बसस्थानकावर येऊन प्रतीक्षा करण्याची वेळ येणार नाही. त्यासाठी ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे; परंतु सध्या तरी ही सुविधा सुरू झाली नाही. मोबाइलवर लाइव्ह लोकेशन पाहता येत नाही. लोकेशन कधी होणार असा प्रश्न आहे.
अॅप'चे काय झाले?
परिवहन विभागाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसचे लोकेशन माहिती करून घेण्यासाठी सध्या तरी कुठलीही सिस्टिम सुरू नाही. त्यासाठी अजून वाट बघावी लागणार आहे. प्रशासन सिस्टीम सुरु असून कर्मचाऱ्यांना माहिती असल्याचे सांगत आहेत.
एसटी बसला जीपीएस
बसेसला जीपीएस बसविले आहे; परंतु ही सिस्टिम प्रवाशांच्या सेवेत अद्याप तरी सुरू नाही. बसमधील जीपीएस प्रायोगिक तत्त्वावर आहे. त्यामुळे प्रवाशांना या सिस्टिमचा उपयोग होत नसल्याचे सांगण्यात आले.
"प्रवाशांना एसटी बसचे लाइव्ह लोकेशन कळावे, यासाठी महामंडळाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असून, त्याअनुषंगाने जीपीएस सिस्टिम, अॅप विकसित करण्यात आले आहे. येणाऱ्या काही महिन्यांत ही सुविधा उपलब्ध होईल."
- तनुजा अहिरकर, विभागीय नियंत्रक