खोट्या नुकसानभरपाईसाठी 'त्याने' रचला वाघाच्या हल्ल्याचा बनाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 11:51 IST2025-04-08T11:45:31+5:302025-04-08T11:51:41+5:30
Bhandara : डॉक्टरांनी १४ इंजेक्शन देऊ म्हणताच सत्य आले पुढे

'He' faked a tiger attack to get false compensation
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सकाळी शेतात मोहाची फुले वेचत असताना, आपल्यापुढे चक्क वाघ आला. त्याने हल्ला करून जखमी केल्याने बेशुद्ध झालो, असे सांगत 'तो' वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून रुग्णालयात भरतीही झाला. मात्र, रेबीजचे १४ इंजेक्शन घ्यावे लागतील, असे डॉक्टरांनी सांगताच नुकसानभरपाई म्हणून मिळणारी रक्कम लाटण्यासाठी त्याने रचलेला बनाव उघड झाला.
वाघाचा हल्ला झाल्याचा बनात रचणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव दुधराम राजीराम मेश्राम (वय ४१) असे असून, तो साकोली तालुक्यातील मोहघाटा गावातील रहिवासी आहे. रविवारी सकाळी मोहफुले वेचण्यासाठी गेलो असता, आपल्यावर वाघाने हल्ला केल्याचा बनाव त्याने रचला. बेशुद्ध पडल्यावर शेजारच्या शेतातील शेतकऱ्यांनी घरी आणल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, तो जखमी झाल्याचे कळल्याने वनरक्षक रामेश्वर भराडे यांनी त्या शेतकऱ्याला दवाखान्यात नेले. काही वेळात वनविभागाची चमूही रुग्णालयात पोहोचली. डॉक्टरांना आणि वनविभागाच्या पथकालाही त्याने हीच कहाणी सांगितली. मात्र, त्याच्या पोटावरील जखमा पाहून सर्वांनाच शंका आली.
अखेर सत्य वदवून घेण्यासाठी डॉक्टरांनी आणि अधिकाऱ्यांनी युक्ती केली, वाघाच्या नखांचे विष होऊ नये, म्हणून पोटात रेबीजचे १४ इंजेक्शन घ्यावेच लागतील, असे डॉक्टरांनी सांगितले. ते ऐकताच दुद्धरामची चळबळ वाढली. मेलो तरी चालेल, पण इंजेक्शन घेणार नाही, असे सांगून त्याने स्पष्ट नकार दिला. दुधराम खोटे बोलत असल्याचे लक्षात आल्याने शहानिशा करण्यासाठी त्याला शेतावरील कथित घटनास्थळी नेले गेले. मात्र, त्या मोहाच्या झाडाला फुलेच नव्हती. वाघ नेमका कुठे होता, तो कसा दिसला, किती अंतरावर होता, अशी प्रश्नांची सरबत्ती केल्यावर, आपण बेशुद्ध असल्याने काहीच आठवत नाही, अशी दिशाभूल त्याने केली.
वनविभागाच्या चमूने परिसराची पाहणी केली असता, वाघाचे पगमार्कही कुठेच आढळून आले नाहीत. अखेर त्याचा खोटेपणा लक्षात आल्यावर त्याला गावात परत आणण्यात आले.
म्हणे, मी झुडपात पडलो...
मला वाघ दिसला, पण त्याने मला जखमी केले नाही. मी झुडपात पडलो, असा जबाब दुधरामने दिला आहे. तथापि, वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, दुधरामने दाखविलेल्या घटनास्थळी कुठलीही झुडपे आढळली नाहीत. सहायक वनरक्षक संजय मेंढे यांच्याकडे विचारणा केली असता, चर्चेत येण्यासाठी किंवा वाधाने हल्ला केल्याचे सांगितल्यास पैसे मिळतील, या लालसेपायी त्याने असा बनाव केला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. तो झाडावरून पडला असावा किंवा एखाद्या झुडपात पडल्याने काटे ओरबाडले असावे, असा अंदाज वनरक्षक कुंभरे यांनी व्यक्त केला.