खुनारी येथे चार वर्ग व एक शिक्षक; कसे होणार विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 11:34 IST2024-08-22T11:32:22+5:302024-08-22T11:34:40+5:30
भरतीला विलंब : शिक्षणाचा खेळखंडोबा, शासनाचे दुर्लक्ष

four classes and one teacher at Khunari; How will the future of students be bright?
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : विद्यालयात पटसंख्येच्या आधारावर शिक्षकांची नियुक्ती नियमानुसार असते. परंतु जिल्ह्यातील बऱ्याच विद्यालयात नियमानुसार शिक्षकांची नियुक्ती अथवा भरती नसल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे. शासन स्तरावरून योग्य त्या भरतीच्या निर्णयाला विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
लाखनी तालुक्यातील खुनारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक ते चार वर्ग असून एकच शिक्षक असल्याने मोठी समस्या उभी आहे. गावच्या शाळा समितीने पुढाकार घेत पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांना गावच्या शाळा समितीचा ठराव घेऊन शिक्षकाची मागणी करण्यात आली आहे. एक शिक्षक चार वर्ग सांभाळू शकत नाही. त्यापुढे जाऊन सुद्धा शैक्षणिक काम, सभा व इतर शासकीय उपक्रम राबविताना एका शिक्षकाला निश्चितच शक्य नाही.
ही बाब प्रकर्षाने गावकऱ्यांनी पंचायत समितीला कळवली आहे. मात्र, अजूनही त्यांना ठोस आश्वासन मिळाले नसल्याने समस्या कायम आहे. पटसंख्येच्या आधारावर शिक्षक अपेक्षित आहे. याकरिता गावकऱ्यांनी व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने खासदार, आमदार, सभापती पंचायत समिती लाखनी तथा जिल्हा परिषद सदस्य मुरमाडी यांना निवेदन देत विद्यार्थ्यांच्या गैरसोयीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.