वन विभागाने हाणून पाडली वाघाच्या चामड्याची तस्करी, चंद्रपुरातील दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 15:31 IST2023-06-21T15:28:48+5:302023-06-21T15:31:34+5:30
व्याघ्र चर्मासह केली अटक : पवनी वनपरिक्षेत्रात कारवाई

वन विभागाने हाणून पाडली वाघाच्या चामड्याची तस्करी, चंद्रपुरातील दोघांना अटक
गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : चंद्रपूर जिल्ह्यातील दोन आरोपींकडून होणार असलेली वाघाच्या चामड्याची तस्करीभंडारा आणि नागपूर वन विभागाच्या पथकाने केलेल्या संयुक्त मोहिमेत हाणून पाडली. या प्रकरणी दोघांना वाघाच्या चामड्यासह अटक करण्यात आली आहे.
निलेश सुधाकर गुजराथी (३३, चंद्रपूर) आणि विकास बाथो अशी या आरोपींची नावे आहेत. वाघाच्या चामड्याची तस्करी होणार असल्याची गोपनिय माहिती वन विभागाच्या पथकाला माहीत झाली होती. या माहितीवरून नागपूर व भंडारा वनविभागाच्या पथकाने संयुक्त मोहिम आखली. एक विशेष पथक तयार करुन संबंधित आरोपींच्या हालचालीवर नजर ठेवली. दरम्यान, सोमवारी २१ जूनला सकाळी सापळा रचून तस्करी करणाऱ्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ८२ सेंटीमीटर लांबीचे आणि ७९ सेंटीमीटर रुंदीचे वाघाचे कातडे जप्त करण्यात आले. एवढच नाही तर गुन्ह्यात वापरलेली एमएच ३४ सीबी २७१७ क्रमांकाची दुचाकीही जप्त करण्यात आली. दोन्ही आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या विविध कलामाद्वारे वनगुन्हा नोदविण्यात आला.
ही कारवाई नागपूरचे उपवनसंरक्षक भारत सिंह हांडा आणि भंडाराचे राहुल गवई यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वन अधिकारी (दक्षता) पी.जी. कोडापे, वन परिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) पवनी, हिरालाल बारसगडे, प्रमोद वाडे, निलेश तवले, दिनेश पडवळ, आर एस पोरेत आदींनी पार पाडली. पुढील तपास भंडाराचे सहाय्यक वन संरक्षक वाय. व्ही. नगुलवर करीत आहेत.