संतप्त पूरग्रस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या दारावर मांडला ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 11:41 IST2024-12-10T11:40:29+5:302024-12-10T11:41:52+5:30
आथली गावातील प्रकार: दोषींवर निलंबनाची कारवाईची मागणी

Flood affected farmers staged a protest at the door of the Tehsil office
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : अतिवृष्टीमुळे व आलेल्या पुरामुळे गावातील अनेकांच्या घरांची पडझड तथा शेतमालाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळावा, यासाठी निर्देशांनुसार शेतीचे पंचनामे करून याद्या तयार करण्यात आल्या नाहीत. त्यात मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला. मुख्य पूरग्रस्तांना बाजूला सारून, अन्य लोकांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आले. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारला लाखांदूर तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन सादर केले.
पावसाळ्यात तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यात आथली गावात देखील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले होते. नुकसानीचा मोबदला मिळावा या हेतूने तलाठी व ग्रामसेवक यांच्यामार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे पंचनामे करून त्यांच्या याद्या तयार करण्याचे निर्देश लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांनी तलाठी व ग्रामसेवक यांना दिले होते. आथलीतील तलाठी व ग्रामसेवक यांनी या सूचनेकडे दुर्लक्ष करून कार्यरत कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण व याद्या तयार करायला लावले.
कर्मचाऱ्यांनी शासन नियमांना तिलांजली देत ओलिताखाली असलेल्या शेतकऱ्यांना कोरडवाहू दाखविले तर कोरडवाहू शेतकऱ्यांना ओलिताखाली दाखविले. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांची शेती कमी दाखविली. नुकसान न झालेल्या शेतकऱ्यांच्या पूर्णतः शेतीचे नुकसान दाखविले आहे. 'आमदनी अठ्ठणी, खर्चा रुपय्या' अशी गत आथली येथील शेतकऱ्यांची आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मनमर्जीतील लोकांकरीता पैसे घेऊन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आहे. निवेदन देताना पुरुषोत्तम ठाकरे, बाजार समितीचे संचालक डेलीस ठाकरे, सरपंच बागडे, चंद्रशेखर ठाकरे, दिनेश सोनपिंपळे, नरेश बेदरे, नरेश प्रधान, मेघशाम सुखदेवे, पुंडलिक नागोसे, श्रीहरी ठाकरे, प्रदीप भावे, देवा करकाडे, शीलवंत बांबोळे, पुरुषोत्तम कुंभलकर यांच्यासह ८६ शेतकरी उपस्थित होते.
वेळेवर केले ठिय्या आंदोलन
निवेदन सादर करताना लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार उपस्थित नसल्यामुळे पीडित शेतकऱ्यांनी काही काळ तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केला. त्यानंतर नायब तहसीलदार धकाते यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत निवेदन स्वीकारले.