सासराच बनला सुनेचा कर्दनकाळ, मानेवर केले कुऱ्हाडीचे वार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 17:25 IST2023-06-16T17:24:00+5:302023-06-16T17:25:32+5:30

मोहाडी तालुक्यातील रोहणा येथील थरार

father-in-law killed daughter-in-law with an axe in bhandara | सासराच बनला सुनेचा कर्दनकाळ, मानेवर केले कुऱ्हाडीचे वार 

सासराच बनला सुनेचा कर्दनकाळ, मानेवर केले कुऱ्हाडीचे वार 

भंडारा : सासरा व सुनेतील भांडण इतके विकोपाला गेले की सासऱ्याने रागाच्या भरात सुनेच्या मानेवर कुऱ्हाडीचे वार घालून तिची हत्या केली. पिंकी सतीश ईश्वरकर (२५) असे मृत पावलेल्या सुनेचे नाव आहे. ही थरारक घटना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील रोहणा येथे शुक्रवारी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास घडली. बळवंत रघुजी ईश्वरकर (५५, रोहणा) असे आरोपी सासऱ्याचे नाव आहे. मृत पिंकीला तीन वर्षाचा एक मुलगा असून आईच्या प्रेमाला मुकला आहे.

बळवंत ईश्वरकर हा मुलगा सतीश व सून पिंकी ईश्वरकर व तीन वर्षांच्या नातवासोबत एकाच घरात राहयचे. बळवंतच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले. काही दिवसांपासून सासरा व सुनेत नेहमी भांडण होत असल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. शुक्रवारी सकाळी पिंकी भांडी घासत असताना सासरा बळवंत याने मागेहून येऊन पिंकीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केला. तशीच ती रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली. यावेळी तिचा पती व मुलगा किराणा दुकानात गेले होते. 
बळवंत ईश्वरकरला अटक करण्यात आली आहे. भांडण कशावरून सुरू होते, सुनेची हत्या करण्यापर्यंत बळवंतने निर्णय का घेतला, हत्येचे नेमके कारण काय, या दिशेने मोहाडी पोलिस तपास करीत आहेत.

स्वत: च गेला पोलिस ठाण्यात

सुनेवर कुऱ्हाडीचे घाव घातल्यानंतर आरोपी बळवंत हा स्वत: च मोहाडी पोलिस ठाण्यात गेला. तसेच त्याने सुनेची हत्या केल्याची माहिती दिली. याचवेळी त्याला ताब्यात घेत पोलिसांनी घटनास्थळ गाठले.

Web Title: father-in-law killed daughter-in-law with an axe in bhandara