ऊस तोडणीसाठी मजूर नसल्याने शेतकऱ्यांवर ऊस जाळण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 12:15 IST2025-02-20T12:13:59+5:302025-02-20T12:15:00+5:30

परसवाड्यातील शेतकरी हतबल : मजुरीअभावी कामगार पळाले, परसवाडातील प्रकार

Farmers forced to burn sugarcane as there are no laborers to harvest sugarcane | ऊस तोडणीसाठी मजूर नसल्याने शेतकऱ्यांवर ऊस जाळण्याची वेळ

Farmers forced to burn sugarcane as there are no laborers to harvest sugarcane

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) :
उभ्या ऊसपिकांची तोडणी झाली नसल्याने शेतकऱ्यांनी उसाचे पीक जाळायचे काय, असा प्रश्न परसवाडा गावातील संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. उन्हाळ्यात लवकर उसाची कापणी आणि उचल झाली नसल्याने या परिसरातील ४०० एकरांतील शेतकऱ्यांना फटका बसण्याची वेळ आली आहे. मानस अॅग्रो प्रा. लि. देव्हाडा ऊस कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाने दखल घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.


वैनगंगा नदीच्या खोऱ्यात असणाऱ्या परसवाडा शेतशिवारात उसाची लागवड केली जाते. या परिसरात ६०० ते ७०० एकर शेतीत शेतकऱ्यांनी उसाचे उत्पादन घेतले आहे. या सर्व उसाची उचल होण्याची अपेक्षा असताना मानस अॅग्रो कारखान्याने फक्त १५० ते २०० एकर शेतीतील उसाची उचल केली आहे. उर्वरित ४०० एकर शेतीत उसाचे पीक तोडणीच्या प्रतिक्षेत आहे.


ऊस तोडणीसाठी नकार
ऊसतोड कामगारांना वेतन न मिळाल्याने कामगारांच्या टोळ्या गावाकडे परतल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चिंता निर्माण झाली आहे. येत्या १० दिवसांत उसाची तोडणी आणि उचल झाली नाही तर, संपूर्ण उभे पीक जाळून टाकण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्याला निवेदनातून दिला आहे. त्यात अंकुश हुड, अरुण राऊत, अतुल नंदरधने, नरेश राऊत, बाळकृष्ण विठुले, वसंता पांडे, गंगाधर गौपाले, अनिल लांडगे, गोविंदा शेंडे व ३५ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहे.


शेतकऱ्यांना चिंतेने ग्रासले
जवळपास ४०० एकर शेतीत उस उभा आहे. लवकरच उन्हाळा सुरु होत आहे. वेळीच कापणी आणि उचल झाली नाही तर वजनात घट होण्याची शक्यता असल्याने त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. कारखान्यात प्रती टनामागे जळीत कापले जाते. त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसत असतो. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.


मजुरांकडून वाढीची मागणी
मजुरांनी ऊस तोडणीसाठी थेट दरात वाढीची मागणी केली आहे. प्रति टनामागे २०० रुपयांची वाढ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झेपण्यासारखी नाही. यासंदर्भात कारखान्यात तक्रार केली तर, कारखाना व्यवस्थापन दाद देत नाही. यामुळे वाढीव मजुरी दिली नाही तर शेताततच उस वाळण्याची भीती आहे. ती दिली तर आर्थिक बजेट कोलमडण्याचा धोका आहे. यामुळे करावे तरी काय, अशी अवस्था आहे.


जळीत उस कपातीला शेतकऱ्यांचा विरोध
जळीत उस कारखान्यात गेल्यास यापोटी कारखान्याकडून २० टक्के रक्कम कपात केली जाते. मात्र याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. उसाचे फड जाळल्याशिवाय तोडणी करत नाहीत. यामुळे होणारे नुकसान आमचेच असते. तरीही कारखान्याकडून पुन्हा २० टक्के रक्कम कपातीचे धोरण अन्यायकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अशातच कधी सुरू तर कधी बंद अशी कारखान्याची अवस्था आहे. यामुळे शेतकरी संतापले आहेत.

Web Title: Farmers forced to burn sugarcane as there are no laborers to harvest sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.