वाटाणा काढताना तोल गेला, थ्रेशर मशीनमध्ये दबून शेतकऱ्याचा मृत्यू
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: February 19, 2024 18:35 IST2024-02-19T18:34:50+5:302024-02-19T18:35:09+5:30
शेतातील वाटाणा काढणीला आल्याने एका मजुरासह ते मशिनमधून वाटाणा काढत होते.

वाटाणा काढताना तोल गेला, थ्रेशर मशीनमध्ये दबून शेतकऱ्याचा मृत्यू
भंडारा: पवनी तालुक्यातील आसगावलगतच्या रनाळा या गावातील शेतशिवारात स्वतःच्या शेतातील वाटाणा थ्रेशर मशिनमधून काढत असताना असताना तोल गेला. यामुळे तरूण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. सुरेश दयाराम वैरागडे (३४, रनाळा, ता. पवनी) असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.
ही थ्रेशर मशिन सुरेश वैरागडे यांच्या स्वतःच्याच मालकीची आहे. शेतातील वाटाणा काढणीला आल्याने एका मजुरासह ते मशिनमधून वाटाणा काढत होते. दरम्यान मजूर पाणी पिण्यासाठी गेला असता सुरेश यांचा तोल गेल्याने ते थेट मशिनमध्ये सापडले. यात त्यांचा हात डोके मशीनमध्ये गेल्याने त्यांचा काही कळण्याच्या आतच चुराडा झाला. हाप्रकार लक्षात आल्यावर एकच हल्लाकोळ उडाला. शेतकऱ्यांनी आणि मजुरांनी धान घेतली, मात्र तोपर्यंत सर्व काही संपले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. तरूण शेतकऱ्याचा शेतातील कामावरच असा ओघाती मृत्यू झाल्याने गावपरिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.या संदर्भात पोलिसांना कळविल्यावर तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डाॅक्टरांनी मृत घोषित केले.
भावाचा १२ वर्षापूर्वीच मृत्यू
सुरेश वैरागडे यांच्या भावाचा सुमारे बारा वर्षाआधी मृत्यू झाला होता. त्यामुळे कुटुंबातील संपूर्ण जबाबदारी सुरेशवरच होती. आता घरातील कर्ता पुरुष गेल्याने वैरागडे परिवारावर दुख:चा पहाडच कोसळला आहे.