अल्पवयीन विद्यार्थिनीला पळवून नेण्याचा डाव फसला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 16:29 IST2022-04-08T16:18:40+5:302022-04-08T16:29:49+5:30
विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून तालुक्यातील रेंगेपार कोहळीच्या दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

अल्पवयीन विद्यार्थिनीला पळवून नेण्याचा डाव फसला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
लाखनी (भंडारा) : एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून दुचाकीवर जबरीने बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न वडिलांच्या सतर्कतेने टळला. ही घटना लाखनी येथे बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी गुरूवारी सायंकाळी विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून तालुक्यातील रेंगेपार कोहळीच्या दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अनिकेत शहारे (२०) व सुरज जीवतोडे (२२) दोघे रा. रेंगेपार (कोहळी) ता. लाखनी अशी आरोपींची नावे आहेत. लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या एका गावातील अल्पवयीन विद्यार्थिनी शिक्षणासाठी लाखनी शहरात येत होती. तहसील कार्यालयाच्या परिसरात बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अनिकेत शहारे पाठलाग करून इशारे करीत होता. तिच्या वडिलांनी अनिकेतला समजावून संगितले. मात्र तो मित्राला सोबत घेऊन आला. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनीला सुरज जीवतोडे याने जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अनिकेतकडे घेऊन जात होता. त्याचवेळी वडिलांनी या दोघांना पकडल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
वडिलांच्या तक्रारीवरून विनयभंग, पळवून नेणे, धमकी देणे तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये लाखनी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक मनोज वाढीवे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संजय कोरचे करीत आहेत. वृत्त लिहिस्तोवर आरोपींना अटक झाली नव्हती. या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.