कॉपीमुक्त अभियानाचा पुन्हा फज्जा ! दहावी इंग्रजीच्या पेपरचा काढला फोटो; पाच जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 11:55 IST2025-03-03T11:53:28+5:302025-03-03T11:55:33+5:30
Bhandara : अशी आहेत पोलिस कोठडी ठोठावलेल्यांची नावे

Copy-free campaign is again a mess! Photograph taken of 10th English paper; Five people were arrested
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर (भंडारा) : इयत्ता दहावीचा इंग्रजीचा पेपर चक्क परीक्षा केंद्रातून मोबाइलवर फोटो काढून व्हायरल करण्याचा प्रयत्न लाखांदूरजवळच्या बारव्हा येथील एका केंद्रावर घडला. सुदैवाने पेपर व्हायरल झाला नाही. या प्रकरणात लाखांदूरचे गटशिक्षणाधिकारी तत्त्वराज अंबादे यांच्या तक्रारीवरून तिघा जणांविरोधात दिघोरी मोठी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आणखी दोघांना अटक केली. याप्रकरणी न्यायालयाने संबंधितांना ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
१ मार्च रोजी दहावीचा इंग्रजीचा पेपर सुरू झाल्यानंतर ११:३० वाजता केंद्रातील एक कर्मचारी पेपरचे फोटो काढताना आढळला. ही माहिती बोर्डाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार त्या भागातील भरारी पथकाला माहिती देण्यात आली. शिक्षणाधिकाऱ्यांचे भरारी पथक १० मिनिटांत बारव्हा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय चिचाळ जैतपूर व जिल्हा परिषद हायस्कूल येथील केंद्रावर पोहोचले.
हा प्रकार खरा असल्याचे पथकाच्या लक्षात आले. झालेल्या प्रकाराची गांभीर्यता लक्षात घेता लाखांदूरचे गटशिक्षणाधिकारी तत्त्वराज अंबादे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात दिघोरी मोठी पोलिसात गुन्हा दाखल केला.
या पाचही आरोपींना हजर केले असता २ मार्च रोजी लाखांदूर येथील कनिष्ठ न्यायालयाने ५ मार्चपर्यंत ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
प्रकरणाचा तपास पोलिस करीत असून याप्रकरणी आणखी आरोपींची वाढ होते काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तपास लाखांदूरचे पोलिस निरीक्षक सचिन पवार करीत आहेत.
अशी आहेत पोलिस कोठडी ठोठावलेल्यांची नावे
विशाल बाबुराव फुले (४१), दीपक दयाराम मेश्राम (३५ रा. मानेगाव), मयूर कृष्णकुमार टेंभरे (३५, रा. विजयनगर गोंदिया), राकेश केशोराव बिसेन (३५, रा. गोंदिया), सुरेंद्रकुमार शरद पटले (४५, रा. कुडवा, गोंदिया) अशी अटक केलेल्या इसमांची नावे आहेत.