घराच्या हिस्सेवाटणीवरून रक्तपात; धाकट्याने मोठ्या भावाला सब्बल मारून केले जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 16:26 IST2023-06-28T16:24:59+5:302023-06-28T16:26:13+5:30
मुरमाडी तुपकर येथील घटना

घराच्या हिस्सेवाटणीवरून रक्तपात; धाकट्याने मोठ्या भावाला सब्बल मारून केले जखमी
गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : वडिलोपार्जित घराच्या हिस्सेवाटणीवरून मोठ्या भावाने लहान भावासह आईस शिवीगाळ केली. यामुळे राग अनावर होऊन लहान भावाने मोठ्या भावाच्या तोंडावर आणि मानेवर सब्बलीने वार करीत जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात मोठा भाऊ जबर जखमी झाला. ही घटना लाखानी तालुक्यातील मुरमाडी तुपकर गावात २५ जूनच्या रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली.
सोपान बंडू गिल्लोरकर (२८, मुरमाडी तुपकर, ता. लाखनी) असे जखमीचे नाव आहे. तर आरोपीचे नाव अमोल बंडू गिल्लोरकर (२४) असे नाव आहे. वडिलोपार्जित संपत्तीच्या वादावरून दोन भावात शाब्दिक वाद झाला. यात आईला केलेली शिवीगाळ लहान भावाला सहन न झाल्याने घरातील सब्बलचा आणून मोठ्या भावावर वार केले. यात तो जबर जखमी झाला. जखमीला उपचारार्थ दाखल करण्यात आले. जखमीवर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी नितेश गिल्लोरकर याने २६ रोजी पोलिसात तक्रार केल्यावर ठाणेदार वीरसेन चहांदे व पोलिस शिपाई नावेद पठाण यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याची नोंद घेतली आहे. आरोपीला तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली होती. बुधवारी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.