तलवारीने वार करून सासूला ठार मारण्याचा प्रयत्न, जावयाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 18:25 IST2023-05-23T18:25:18+5:302023-05-23T18:25:57+5:30
२५ पर्यंत पीसीआर, वलनी येथील घटना

तलवारीने वार करून सासूला ठार मारण्याचा प्रयत्न, जावयाला अटक
इंद्रपाल कटकवार
भंडारा : वर्षभराहून अधिक काळ पत्नी माहेरी राहिल्याने संतापलेल्या जावयाने उघडपणे वृद्ध सासूवर तलवारीने वार करून खून करण्याचा प्रयत्न केला. गयाबाई मेश्राम (६५)असे गंभीर जखमी झालेल्या सासूचे नाव आहे. ही घटना पवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलनी येथे घडली. पोलिसांनी आरोपी रुपराज मुरारी मंडपे (४१) याला अटक केली आहे. त्याला २५ मेपर्यंत पीसीआरमध्ये ठेवण्याचे आदेश पवनी न्यायालयाने दिले.
माहितीनुसार, आरोपीचे घर व सासरची मंडळी वलनी येथे एकाच वस्तीत राहतात. रूपराज हा वारंवार पत्नीला मारहाण करायचा. यामुळे त्रस्त झालेली त्याची ३७ वर्षीय पत्नी गेल्या वर्षी एप्रिलपासून माहेरी राहत होती. त्यामुळे आरोपी रूपराज हा पत्नीच्या आई-वडिलांवर रागावायचा. पत्नीला घरात डांबून ठेवण्याबाबत विचारणा करत तो शिवीगाळ करायचा.
२२ मे रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास गयाबाई मेश्राम या रूपराजला बुद्ध विहारसमोरील बोअरवेलमधून तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन जाताना बघितले. त्याचवेळी तलवार घेऊन आलेल्याा रूपराजने गयाबाईच्या डोके, डावा हात, काखे आणि डावा पायावर वार केला. गंभीर जखमी गयाबाई यांना तातडीने पवनी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. सध्या तिच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
पीडितेच्या तक्रारीच्या आधारे व वैद्यकीय तपासणी अहवालावरून पवनी पोलिसांनी भादंवि कलम ३०७ आणि भारतीय शस्त्र कायदा कलम ४ व २५ नुसार गुन्हा दाखल करून रूपराजला अटक केली. मंगळवारी पवनी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २५ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याप्रकरणी उपनिरीक्षक हारगुडे तपास करत आहेत.