पाच वर्षीय बालकाला तेंदूपत्ताच्या वाहनाने चिरडले; छोट्या सायकलने जात होता चॉकलेट आणण्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2022 16:03 IST2022-05-28T15:45:59+5:302022-05-28T16:03:48+5:30
अपघात झाल्याचे माहित होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांची गर्दी पाहून चालक वाहन घटनास्थळी सोडून पसर झाला.

पाच वर्षीय बालकाला तेंदूपत्ताच्या वाहनाने चिरडले; छोट्या सायकलने जात होता चॉकलेट आणण्यासाठी
जांब लोहारा (भंडार) : छोट्या सायकालने किराणा दुकानात चॉकलेट आणण्यासाठी जात असलेल्या पाच वर्षीय बालकाला तेंदूपत्ता वाहनाने चिरडल्याची घटना तुमसर तालुक्यातील लंजेरा येथे शनिवारी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारस घडली. वाहनाच्या मागच्या चाकात आल्याने बालकाचा जागीच मृत्यू झाला.
यश योगीराज शेंडे (५) रा. लंजेरा ता. तुमसर असे मृताचे नाव आहे. शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास यश छोटी सायकल घेऊन गावातील किराणा दुकानात चॉकलेट आणण्यासाठी जात होता. त्यावेळी गावातून जाणाऱ्या पिटेसुर ते जांब रस्त्यावर तेंदूपत्ता भरलेले पिकअप वाहन (एमएच ४० वाय ८२३९) वेगाने जात होते. त्यावेळी यश या वाहनाने धडक दिली. तो सायकालसह वाहनाच्या मागच्या चाकात आला आणि जागीच ठार झाला.
अपघात झाल्याचे माहित होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांची गर्दी पाहून चालक वाहन घटनास्थळी सोडून पसर झाला. या अपघाताची माहिती आंधळगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या अपघाताने गावावर शोककळा पसरली आहे.