वेतनाशिवाय ८६ दिवस सेवा... आणि शेवट जीवावर बेतला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 14:47 IST2025-04-29T14:46:33+5:302025-04-29T14:47:11+5:30
Bhandara : अडीच महिने वेतन न मिळालेल्या ग्राम महसूल अधिकारी अजय परचाके यांचा कर्तव्यावरून परतताना अपघाती मृत्यू झाला. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

86 days of service without pay... and the end was a risk to life!
राजू बांते
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : अडीच महिने त्यांनी महसूल विभागाची सेवा केली. परंतु, मागील नोकरीतील लास्ट पे सर्टिफिकेट व सेवापुस्तक पाठविण्यात आले नाही. त्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी अडीच महिने सेवा करूनही त्याच्या हातात एकही रुपया सुद्धा वेतन मिळाले नाही. अखेर त्यांचा अपघातात जीव गेला. या घटनेमुळे प्रशासनातील अधिकारी संवेदनशील आहेत काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रविवारी खमारी येथून कर्तव्य बजावून येत असताना ग्राम महसूल अधिकारी अजय परचाके यांचा मोहाडी भंडारा मार्गावरील गणेश नगरीजवळ अपघात झाला. त्यात त्या महसूल कर्मचाऱ्याचा जागीच जीव गेला. या अपघातामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. घरकुल लाभार्थ्यांना रेती वाटप करण्यासाठी मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, कोतवाल यांचे पथक खमारी येथे गेले होते. रेती वाटपाचे कार्य ज्या मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी तसेच कोतवाल यांनी केले त्या पथकाचे आदेश तहसीलदारांनी काढायला पाहिजे होते. पण, ते काढले गेले नाहीत. रेती वाटपाचे तोंडी आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आल्याची माहिती आहे.
शनिवार व रविवार शासकीय सुट्टी असताना महसूल अधिकारी व कर्मचारी घरकुल लाभार्थ्यांना रेती वाटप करत होते. पण, या वाटपासंदर्भात लेखी आदेश काढण्यात आले नाही. रेती वाटपाच्या भानगडीत अजय परचाके यांचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. अशा वेळेस त्याला शासकीय व अन्य कोणतेही लाभ द्यायचे झाल्यास रविवारच्या दिवशी कर्तव्य बजावण्यासाठी प्रशासनाचा आदेश होता काय, हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
अजय परचाके या तरुण तलाठ्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे कुटुंबीय भंडारा येथे पार्थिव स्वीकारण्यासाठी आले होते. कमावता लेक गेला. आई-वडील व दोन भाऊ आक्रोश करीत होते. तो क्षण अतिशय हृदयद्रावक होता. रात्रीच शवविच्छेदन करून अजय यांचे पार्थिव नागपूर येथे नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोहाडी तहसीलमधील काही महसूल कर्मचारी उपस्थित होते.
रविवारीच कर्मचाऱ्यांची ऑन ड्युटी
एक आठवड्यापासून रेतीची डम्पिंग करण्यात आली होती. त्याचा पंचनामाही तयार करण्यात आला होता. रेती चोरली जाणार हे कारण पुढे करण्यात आले. आठ दिवस रेती तेथे पडून असतानाही रविवारीच कर्मचाऱ्यांची ऑन ड्युटी कशी लावण्यात आली, हा प्रश्न आहे.
असंवेदनशील प्रशासन
अजय परचाके हे चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य सेवक म्हणून नोकरीला होते. ते सेवाकाळात विविध स्पर्धा परीक्षा देत होते. त्यांनी ग्राम महसूल अधिकाऱ्याची सेवा परीक्षा पास केली. ६ फेब्रुवारी रोजी मोहाडी तहसील येथे ग्राम महसूल अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांना नेरी गावाचा सज्जा देण्यात आला होता. त्यांनी साधारणतः अडीच महिने ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्य केले. चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य सेवक म्हणून काम केले. त्या सेवा काळाची लास्ट पे सर्टिफिकेट (एलपीसी) व सेवापुस्तक पाठवण्यात आले नाही. त्यामुळे त्यांचे काही दस्ताऐवज ऑनलाइन करता आले नाही, असे मोहाडी तहसील कार्यालयातील प्रशासनाकडून माहीत झाले. चंद्रपूर येथील संबंधित प्रशासनाने अंतिम वेतनाचा विवरण पाठवला नसल्यामुळे परचाके यांचे वेतन होऊ शकले नाही. यावरून शासन-प्रशासन गतिमान नाही, हे दिसून आले आहे. याबाबतीत प्रतिक्रिया घेण्यासाठी तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांच्याशी दोन-तीन वेळा संपर्क केला. परंतु त्यांनी दाद दिली नाही.