शाळेत कार्यरत ३ तासिका शिक्षक; मात्र पगार काढला पाच कर्मचाऱ्यांचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 11:19 IST2025-04-17T11:17:35+5:302025-04-17T11:19:15+5:30
प्रशासनाकडून दिशाभूल : शाळेतील अन्य शिक्षकांनीच केली गटशिक्षणाधिकाऱ्यांना तक्रार

3 teachers working in school; but salaries of five employees deducted
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर (भंडारा): शासनामार्फत नियमित शिक्षक भरती होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत घड्याळी तासिका शिक्षक नियुक्त केले जातात, मात्र जिल्हा परिषदेच्या शाळेत ३ घड्याळी तासिका शिक्षक कार्यरत असताना ५ घड्याळी तासिका शिक्षकांचे पगार बिल काढले. या प्रकाराची असल्याची तक्रार शाळेतीलच अन्य २ घड्याळी तासिका शिक्षकांनी केली आहे. ही तक्रार १६ एप्रिल रोजी लाखांदूरचे गटशिक्षणाधिकारी तत्त्वराज अंबादे यांना लेखी स्वरूपात केली आहे. संदीप वामनराव मेश्राम व सुरज मारोती बावणे असे तक्रारदार शिक्षकांची नावे आहेत.
लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथे जिल्हा परिषदेची हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आहे. या महाविद्यालय इयत्ता ५ वी ते १२ वी चे विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेतात. शासनाकडून नियमित शिक्षकांची भरती केली जात नसल्याने जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी घड्याळी तासिका शिक्षकांची नियुक्ती केली जाते.
मात्र शाळा प्रशासनाने शासनाची दिशाभूल करीत ३ ऐवजी ५ घड्याळी तासिका शिक्षकांचे पगारबिल काढून पंचायत समिती कार्यालयाला पाठविले आहेत. याप्रकरणी तात्काळ दखल घेऊन शासनाची दिशाभूल करणाऱ्या प्रशासनाविरोधात कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. हा प्रकार मागील दीड वर्षापासून सुरू शाळेत केवळ ३ घड्याळी तासिका शिक्षक कार्यरत असताना ५ घड्याळी तासिका शिक्षकांचे पगार बिल शासनाला पाठवून शासनाची दिशाभूल करीत असल्याचा हा प्रकार मागील दीड वर्षापासून सुरू असल्याचे शाळेतीलच अन्य शिक्षकांनी सांगितले. पगारबिल प्राथमिक विभागाचे घड्याळी शिक्षक म्हणून काढण्यात येत असल्याचा प्रकार आहे. ही बाब मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी चक्क तक्रारदारासह शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, असे तक्रारकर्ते मेश्राम यांनी सांगितले.
अशी आहे नियुक्ती
महाविद्यालयात ५ व्या वर्गासाठी नियमित शिक्षक नियुक्त आहे. ६ ते ८ वर्गासाठी १ नियमित तर २ घड्याळी तासिका शिक्षक कार्यरत आहेत. ९ ते १० वर्गासाठी १ नियमित शिक्षक व १ घताशी शिक्षक कार्यरत आहेत. ११ व १२ वी कला तथा विज्ञान शाखा विना अनुदानित आहेत. विज्ञान शाखेसाठी ३ तर कला शाखेसाठी २ शिक्षक नियुक्त आहेत. कला शाखेसाठी १ नियमित शिक्षक नियुक्त आहेत. तथापि शाळेत ५ ते १० वर्गासाठी ३ घड्याळी तासिका शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.
"शाळेत ३ घड्याळी तासिका शिक्षक कार्यरत असताना शाळा प्रशासनाच्या वतीने ५ घड्याळी तासिका शिक्षकांचे पगार बिल काढले जात असल्याची तक्रार मला प्राप्त झाली. या तक्रारीच्या आधारावर उद्याच चौकशी केली जाणार आहे."
- तत्त्वराज अंबादे, गटशिक्षणाधिकारी