२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:20 IST2025-12-31T12:15:11+5:302025-12-31T12:20:27+5:30
Ganesh Chaturthi 2026 Ganeshotsav Date: नवीन वर्ष सुरू झाले की, पहिल्यांदा यंदा गणपती कधी आहे? किती दिवस गणेशोत्सव आहे? हे पाहिले जाते. सविस्तर जाणून घ्या...

२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
Ganesh Chaturthi 2026 Ganeshotsav Date: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ प्रथमेश गणपती हे कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत. कोणत्याही कार्याची सुरुवात ही गणपती पूजनाने केली जाते. गणपती बाप्पाचे केवळ नाव ऐकले मात्र तरी मनात चैतन्य संचारते. सकारात्मकता लाभते. गणपतीचे महात्म्य, महती वर्णावी तेवढी कमीच आहे. नवीन वर्ष सुरू झाले की, पहिल्यांदा यंदा गणपती कधी आहे? किती दिवस गणेशोत्सव आहे? हे पाहिले जाते. २०२६ ला श्री गणेश चतुर्थीगणेशोत्सव कधी आहे? गौरी आगमन, अनंत चतुर्दशी यांच्याही तारखा जाणून घेऊया...
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
मराठी वर्षात गणेशाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. यापैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजचे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. २०२६ च्या पहिल्याच जानेवारी महिन्यात श्री गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. गुरुवार, २२ जानेवारी २०२५ रोजी श्री गणेश जयंती आहे. माघ महिन्यातील ही विनायक चतुर्थी तिलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी या नावानेही ओळखले जाते. तर, शुक्रवार, ०१ मे २०२६ रोजी पुष्टिपती विनायक जयंती आहे.
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव
गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. सन २०२५ मध्ये २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणपती होते. यंदा २०२६ मध्ये सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. १४ सप्टेंबर २०२६ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.
श्रीगणेश चतुर्थीला पार्थिव गणपती पूजनाची प्राचीन परंपरा
सुमारे ३.५ हजार वर्षांपूर्वी गणेश पूजनाला प्रारंभ झाला. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव म्हणजे मातीच्या गणेशमूर्तीचे पूजन करण्यास शास्त्रात सांगितले आहे. प्राचीन काळी शेतावर किंवा नदीकाठी जाऊन तेथील मातीची गणेशमूर्ती तयार करून तेथेच पूजन व लगेच विसर्जन करत असत. त्यानंतर गणेशमूर्ती घरी आणून दीड, तीन, पाच, सात किंवा अनंत चतुर्दशीपर्यंत पूजन करून नंतर मूर्तीचे विसर्जन करण्याची प्रथा सुरू झाली. सन २०२६ मध्ये ज्येष्ठ महिना अधिक असल्यामुळे बाप्पांचे आगमन १८ दिवस उशिराने होणार आहे. या वर्षी गणेश चतुर्थी ही १४ सप्टेंबर २०२६ रोजी असेल.
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
श्री गणेश चतुर्थी गणेशोत्सवातील महत्त्वाच्या तारखा
- सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी भाद्रपद शुद्ध विनायक चतुर्थी म्हणजेच श्रीगणेश चतुर्थी आहे. या दिवशी पार्थिव गणपती पूजन करायचे आहे. या दिवसापासून गणेशोत्सवास सुरुवात होते. चंद्रदर्शन निषेध - चंद्रास्त रात्रौ ०८ वाजून ४४ मिनिटे.
- मंगळवार, १५ सप्टेंबर २०२६ रोजी भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषिपंचमी आहे. याच दिवशी गजानन महाराज पुण्यतिथी आहे.
- गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी ज्येष्ठा गौरी आगमन आहे. सायंकाळी ०७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत ज्येष्ठागौरी आवाहन आहे.
- शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६ रोजी ज्येष्ठागौरी पूजन आहे. गौरी ही गणपतीची माता पार्वती होय. तिला महालक्ष्मी असेही म्हणतात. प्रथेनुसार तेरड्याच्या, खड्यांच्या, मुखवट्यांच्या किंवा मूर्तीच्या रूपात गौरी आणल्या जातात.
- शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ रोजी ज्येष्ठागौरी विसर्जन आहे. याच दिवशी भाद्रपद शुद्ध अष्टमी म्हणजेच दुर्गाष्टमी आहे.
- शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी गणेशोत्सवाची सांगता होणार आहे.