Hartalika Teej 2025: वर्षानुवर्षे हरितालिका पूजन करणार्‍या महिलांनी सांगितला चमत्कारिक अनुभव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 07:10 IST2025-08-26T07:00:00+5:302025-08-26T07:10:02+5:30

Hartalika Teej 2025: हरितालिका व्रत सौभाग्यासाठी केले जाते, या व्रताचे अनेक लाभ आहेत, अनेक वर्ष हे व्रत करणार्‍या महिलांनी अनुभवलेला चमत्कार जाणून घ्या.

Hartalika Teej 2025: Women who have been worshipping Hartalika for years share their miraculous experience! | Hartalika Teej 2025: वर्षानुवर्षे हरितालिका पूजन करणार्‍या महिलांनी सांगितला चमत्कारिक अनुभव!

Hartalika Teej 2025: वर्षानुवर्षे हरितालिका पूजन करणार्‍या महिलांनी सांगितला चमत्कारिक अनुभव!

हरितालिका(Hartalika Teej 2025) या शब्दाचा अर्थ आहे हरिता म्हणजे जिला नेले ती अर्थात पार्वती आणि आलिका म्हणजे सखी. पार्वतीला तिच्या तपश्चर्येच्या पूर्ततेसाठी ज्या सख्यांनी साथ दिली त्यांचा आज उत्सव आणि उद्या गणेश चतुर्थी(Ganesh chaturthi 2025) अर्थात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन!

हरितालिकेची पूजा मांडताना पाटावर वाळूचे शिवलिंग आणि सखी पार्वती काढतात. त्यांची पूजा करून हळद कुंकू वाहतात. पत्री अर्थात विविध झाडांची पाने वाहतात आणि हरितालिकेची कहाणी व आरती म्हणून पूजा पूर्ण करतात. या पूजेत काही ठिकाणी पार्वतीच्या सखी म्हणून दोन सारख्या मूर्ती मांडल्या जातात. त्यांच्या बाबतीत जाणवणारी चमत्कारिक गोष्ट अनेक ज्येष्ठ अनुभवी स्त्रियांकडून ऐकायला मिळते. 

Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!

त्या दोन्ही मूर्ती पूजेत मांडलेल्या असताना सारख्या दिसत असल्या तरी उत्तर रात्रीपर्यंत त्यांच्या चेहऱ्यांमध्ये भेद दिसू लागतात हरितालिकेच्या दिवशी अर्थात भाद्रपद त्रयोदशीला शंकरांनी पार्वतीला आशीर्वाद दिला आणि विवाहासाठी होकार दिला. या आनंदाचा प्रभाव तिच्या सख्यांवरही पडला. त्याचेच तेज सख्यांच्या मूर्तीवर उत्तर रात्री चढत जाते असे म्हणतात. दोन सख्यांमध्ये पार्वतीची समवयस्क एक सखी अचानक प्रौढ तर दुसरी अल्लड जाणवू लागते. हरितालिकेची पूजा करून, दिवसभर उपास करून, रात्री जागरण करताना पुन्हा एकदा हरितालिकेची आरती केली जाते, तेव्हा त्या मूर्तींमध्ये झालेला भेद 'मनोभावे' व्रत करणाऱ्या महिलांना जाणवतो. हीच बाब गौरी पूजेच्या वेळी दोन मुखवट्यांमध्ये जाणवते आणि त्यांच्यात ज्येष्ठा-कनिष्ठा हा भेद जाणवू लागतो. 

हा भास की सत्य?

याबद्दल निश्चितपणे सांगता येणार नाही, परंतु हे सत्यही नाकारता येणार नाही. हा बदल जाणवण्यामागे भारतीय संवेदनशील मन डोकावते. आपण मूर्तीला केवळ वस्तू म्हणून पाहत नाही, तर त्यात भाव ओतून, जीव ओतून त्याची पूजा करतो. त्यामुळे निर्जीव असणाऱ्या मूर्ती देखील सजीव वाटू लागतात आणि त्या मूर्तीतले चैतन्य आपल्याला जाणवू लागते. गणेश मूर्तीच्याही बाबतीत तेच आहे. प्राणप्रतिष्ठा होण्याआधीची मूर्ती आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरची मूर्ती यातला भेद लक्षात येतो. याला भास म्हणा किंवा सत्य म्हणून मान्य करा ही बाब वेगळी, पण सकारात्मकतेचे दर्शन घडते हे नक्की! उत्सवामुळे निर्जीव वस्तूंमध्ये चैतन्य जाणवू शकते तर मानवी देहात त्यामुळे किती स्पंदने निर्माण होत असतील याचा विचार करून बघा! 

हरितालिका व्रताचे सार: 

माता पार्वतीने ज्याप्रमाणे आपल्या ध्येय प्राप्तीसाठी तपाचरण केले, आपल्यासाठी अनुरूप जोडीदार निवडला, त्याच्या प्रतिकूल परिस्थितीत राहण्याची तयारी दर्शवली आणि तिचे पिता हिमालय यांनी तिच्या मताचा आदर करत शिव पार्वतीचा विवाह लावून दिला. सख्यांनी साथ दिली आणि शिवशंकरांनी पार्वतीच्या त्यागाचा मान राखत तिला अर्धांगीनीचा हक्क दिला. या सर्वांवरून स्त्री सबलीकरण, विचार स्वातंत्र्य, कौटुंबिक ऐक्य आणि स्त्री पुरुष समानता हे सगळे विषय पुराण काळापासून नुसते चर्चेत नाही तर आचरणात आणले जात होते, हा बहुमूल्य संदेश आपल्याला मिळतो! 

ही सगळी माहिती वाचून एव्हाना तुम्हीसुद्धा पूजेत ठेवलेल्या सख्यांकडे एक दृष्टिक्षेप टाकला असेल हे निश्चित! त्यांची आताची भावमुद्रा आणि उत्तर रात्री पूजेतली भावमुद्रा यांचे निरीक्षण जरूर करा!

Web Title: Hartalika Teej 2025: Women who have been worshipping Hartalika for years share their miraculous experience!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.