गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 11:24 IST2025-08-27T11:24:12+5:302025-08-27T11:24:54+5:30

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पा म्हटल्यावर एकासुरात मोरया असा गजर आपण करतो, पण गणपतीला हे दोन्ही शब्द कसे जोडले गेले त्याची गोष्ट जाणून घेऊ. 

Ganesh Chaturthi 2025: Why and how were the words 'Bappa' and 'Morya' added before the name of Ganesha? Read! | गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

...आणि आपले बाप्पा घरोघरी विराजमान झाले. आता दहा दिवस गणेश उत्सवानिमित्त(Ganesh Chaturthi 2025) आरती, भजन आणि मंगलमूर्तीचा गजर....गणपती बाप्पा मोरया! पण प्रश्न पडतो, हे दोन्ही शब्द गणपतीशी कसे जोडले गेले? चला जाणून घेऊ. 

बाप्पा : बाप्पा हा शब्द मराठी नाही, पण त्याचा अर्थ मराठी शब्द बाप अर्थात पालन कर्ता, सर्वांपेक्षा मोठा, सर्वोच्च या अर्थाने घेतला जातो. गणपती ही देवता सर्व देवतांपेक्षा वरचढ आहे. म्हणून तिला बाप्पा म्हटले जाते. शिवाय या नावाने एक आपुलकीचे नाते जोडले जाते. म्हणून तिला बाप्पा म्हणण्याचा प्रघात सुरु झाला. ही आहे बाप्पा शब्दामागची गोष्ट!  आणि मोरया अर्थात नमस्कार हा शब्द कसा जोडला गेला तेही पाहू. 

गणेश चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा संदेश, WhatsApp Status, Messages, Quotes शेअर करत स्वागत करा गणपती बाप्पाचं!

मोरया शब्दाची जोड : 

श्रीक्षेत्र मोरगाव हे श्रीगणेशाचे महत्त्वाचे स्थान आहे. ते महाराष्ट्रात पुण्याजवळ आहे. समर्थ रामदासस्वामी मोरगावच्या श्रीगणेशाच्या दर्शनास गेले. त्यांना श्रीगणेशाने साक्षात दर्शन दिले, त्याच ठिकाणी समर्थांनी सुखकर्ता दु:खहर्ता ही प्रासादिक आरती लिहीली. 

मोरगावच्या मयुरेश्वराचे परमभक्त गोसावीनंदन उर्फ मोरया गोसावी यांनी लिहिलेली 'सिंदुर लाल चढायो, अच्छा गजमुखको' ही हिंदी भाषेतील आरती व 'नाना परिमळ दुर्वा, शेंदूर, शमीपत्रे' ही मराठी भाषेतील आरती सर्वत्र म्हटली जाते.

मोरगावच्या श्रीगणेशाच्या सामर्थ्याचा अनुभव अनेक गणेशभक्तांना आला आहे. मोरगाव येथे गोसावीनंदन, मोरया गोसावी हा परब्रह्माचा अवतार झाला, तो त्यांच्या वडिलांनी केलेल्या उग्र व खडतर गणेश तपश्चर्येमुळे. गोसावीनंदनदेखील आपल्या वडिलांप्रमाणे गणेशाची उपासना करत होते. तेही मयुरेश्वराचे भक्त होते.

मौंजीबंधनानंतर अध्ययन चालू असताना योगीराज नयन भारती यांची भेट होऊन त्यांनी अंतरीची खूण पटवून दिली. अनुग्रह दिला व थेऊरला जाऊन चिंतामणीची सेवा करण्याची गोसावीनंदन यांना आज्ञा केली.गोसावीनंदन यांनी थेऊरला जाऊन राहण्यास आपल्या आईवडिलांची परवानगी मिळवली. ते थेऊरला गेले.

Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?

गोसावीनंदन हे गणेशाचे परमभक्त. गणेशाचे स्मरण करून ते ध्यानस्थ बसू लागले. एकदा ते या अवस्थेतून समाधीअवस्थेत गेले. ही समाधी बेचाळीस दिवसांनी उतरली. त्यांनी आपल्या डोळ्यांनी चिंतामणी पाहिला. त्या दर्शनाने ते कृतार्थ झाले. धन्य झाले. गोसावीनंदन मोरया गोसावी बनले. गणपती मंगलमूर्ती आहे. मंगलमूर्ती मोरया असे गर्जून लोक गणपतीचा आणि गोसावीनंदनाचा एकत्र जयजयकार करू लागले.

मोरया गोसावी यांना अष्टसिद्धी प्राप्त झाली होती. त्यांच्याकडे बघून लोकांना ते साक्षात मोरयाच वाटत. त्यांच्य दर्शनासाठी लोकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत राहिली. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमुळे त्यांच्या गणेशसेवेत खंड पडू लागला. म्हणून ते चिंचवडजवळील थेरगाव येथील किवजाईच्या देवळात येऊन राहू लागले. तिथेही अष्टौप्रहर लोकांची वर्दळ सुरू झाली. नंतर ते लोकांच्या आग्रहास्तव चिंचवड येथे येऊन राहिले.

मोरगावला ते दर चतुर्थीला जाऊन मयुरेशाची पूजा करीत व पंचमीला पारणे करून चिंचवडला परत येत, असा नेम झाला. भाद्रपद चतुर्थी १४९२ मध्ये कऱ्हा  नदीत स्नान करुन अर्घ्य देत असता त्यांच्या हातात गणपती दिसला. तो घेऊन ते घरी आले. व कोठारेश्वरासमोर त्यांनी या मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना केली. काही काळानंतर पुत्र चि. चिंतामणी महाराज यांच्या हाती सर्व सूत्रे व कारभार सोपवून पवनेच्या काठी मोरया गोसावी यांनी संजीवन समाधी घेतली. 

मोरया गोसावी यांच्या घराण्यात सात पिढ्यांपर्यंत गणपतीचा अंश नांदला. जनमानसात वंद्य मानलेल्या गणपतीच्या नावाबरोबर मोरयाचे नाव महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने घेतले जाते. `मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया!

Web Title: Ganesh Chaturthi 2025: Why and how were the words 'Bappa' and 'Morya' added before the name of Ganesha? Read!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.