Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 14:25 IST2025-08-26T14:20:12+5:302025-08-26T14:25:52+5:30
Ganesh Chaturthi 2025 Ganpati Pujan: जितके दिवस घरात गणपती आहे, तितके दिवस सकाळी आणि सायंकाळी न चुकता गणेश पूजन करणे आवश्यकच असते.

Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
Ganesh Chaturthi 2025 Ganpati Pujan: वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ १४ विद्या, ६४ कलांचा अधिपती गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा हा देव आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला भारतातील कोट्यवधी घरात गणपती बाप्पाची पार्थिव मूर्ती आणून पूजन केले जाते. यंदा बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. या दिवशी पार्थिव गणपती पूजन केले जाते. गणेश चतुर्थी २०२५ अनेकार्थाने महत्त्वाची मानली जात आहे. अनेक दुर्मिळ शुभ योगात या गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे. यावेळी गणेश चतुर्थीला दुर्लभ योग जुळून येत आहेत. यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, प्रीति योग, इंद्र योग आणि ब्रह्म योग यांचा समावेश आहे. तसेच महालक्ष्मी योग, महाभाग्य योग, लक्ष्मी नारायण योगही जुळून येत आहेत.
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
श्रीगणेश चतुर्थीला पार्थिव गणपती मूर्ती आणून त्याचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे प्रचलित आहे. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, दहा दिवस अशी गणपती सेवा केली जाते. गणपती आणल्या जाणाऱ्या प्रत्येक घरात आपापले रितीरिवाज, कुळाचार, कुळधर्म, परंपरा यांनुसार गणपती आणून त्याचे पूजन केले जाते. परंतु, केवळ पहिल्या दिवशी पार्थिव गणपती पूजन केले म्हणजे झाले असे नाही. तर मंडळे असो किंवा घरचा गणपती असो. जितके दिवस गणपती आहे, तितके दिवस गणपतीची सकाळी आणि सायंकाळी शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा होणे आवश्यक आहे, असे सांगितले जाते.
५ राशींवर गणपती बाप्पाची कायम कृपा, अपार बुद्धी, कालातीत लाभ; भरघोस भरभराट, भाग्योदय होतो!
घरात असेपर्यंत गणपती बाप्पा पूजन कसे कराल?
पार्थिव गणपती पूजा झाल्यानंतर त्या दिवशी सायंकाळी अनावश्यक गोष्टी बाजूला करून ठेवाव्यात. फुले, दुर्वा, धूप, दीप आणि नैवेद्य दाखवावा. आप्तेष्टांसह आरती करावी. मंडळांचा गणपती असेल तर आरती अधिक उशिरा घेऊ नये. दीड दिवसांचा गणपती असतो, अशा घरी अधिक वेळ आरती केली जाते. परंतु, अधिक रात्री उशिरा आरती करू नये. रात्री झोपण्यापूर्वी गणपतीच्या आजूबाजूची जागा अगदी स्वच्छ करून ठेवावी. शक्य असेल तर भजन, गीत-संगीत-वादन करून जागरण करावे. रात्री झोपण्यापूर्वी गणपतीला मनोभावे नमस्कार करावा. पार्थना करावी. दिवसभरात जी सेवा झाली, त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करावी आणि अनावधानाने काही चूक झाली असेल, तर त्याबाबत क्षमयाचना करावी.
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
गणपती स्तोत्रे म्हणावीत, गणेश मंत्रांचे जप करावेत
दुसऱ्या दिवसापासून दररोज सकाळची पूजा लवकर करावी. षोडषोपचार पद्धतीने पूजन करावे. षोडषोपचार पद्धतीने पूजन करणे शक्य नसल्यास पंचोपचार पद्धतीने पूजन करावे. पूजा झाल्यावर विविध गणेशस्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, गणेश सहस्रनामावली म्हणावी. तसेच गणपतीच्या मंत्रांचा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. मुलांनाही स्तोत्रे शिकवावीत. दुर्वा निवडण्यास शिकवावे. फुले आणि पत्री यांची माहिती द्यावी. नैवेद्याला दाखवले जाणारे मोदक, त्याची माहिती आणि ते कसे बनवायचे याबाबत मुलांना सांगावे. शक्य असेल तर एखाद-दोन मोदक मुलांकडून करून घ्यावेत. म्हणजे आपणही बाप्पाची काही सेवा केल्याचे समाधान त्यांना मिळेल.
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
घरात गणपती असेपर्यंत काही गोष्टींचे भान राखणे आवश्यकच
- गणेशमूर्तीसमोरचा भाग नेहमी स्वच्छ ठेवावा.
- फळे आणि नैवेद्य वेळोवेळी काढून घ्यावे.
- प्रसादाचे सर्वांना वाटप करावे.
- फळांची आणि पेढे इत्यादींची योग्य व्यवस्था करावी.
- घरात गणपती असेपर्यंत न चुकता प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी पंचोपचार पूजा करावी.
- पूजेतील फुले ताजी, स्वच्छ आणि नेटनेटकी असावी. अशीच फुले बाप्पाच्या पूजनात वापरावीत.
- अखंड दिव्याचा संकल्प केला असेल, तर त्याकडे वेळोवेळी लक्ष ठेवावे.
- घरातील वातावरण अगदी आनंदी, सकारात्मक असावे.
- गणपती बाप्पाची कृपा राहावी, यासाठी अनन्य साधारण भावाने सेवा करावी. आपल्याकडून कोणतीही कमतरता राहणार नाही, याची पूरेपूर काळजी घ्यावी.
- अनावधानाने काही चूक झाल्यास मनापासून क्षमायाचना करावी.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...!!!