Dasbodh Lecture: दासबोधातील विचार सुमने ऐकण्याची पार्लेकरांना सुवर्णसंधी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 15:32 IST2023-09-25T15:31:24+5:302023-09-25T15:32:26+5:30
Dasbodh Lecture: २९, ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी विलेपार्ले येथे दासबोधावरील प्रवचनाचा निःशुल्क कार्यक्रम आहे; सविस्तर माहिती वाचा

Dasbodh Lecture: दासबोधातील विचार सुमने ऐकण्याची पार्लेकरांना सुवर्णसंधी!
समर्थ रामदास स्वामी यांच्या दासबोध या ग्रंथाला 'ग्रंथराज' ही उपमा दिली जाते. हा ग्रंथ अतिशय प्रासादिक आहे. अनेक जण त्याचे पारायणही करतात. हा ग्रंथ गुरुमुखातून समजून घेतला असता त्याचा अर्थबोध लवकर होतो. यादृष्टीने विलेपार्लेच्या 'श्रीसमर्थ सेवा मंडळाने' 'ग्रंथराज दासबोधातील विचार सुमने' अशी तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित केली आहे.
समर्थ संप्रदायाचे संस्थापक समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली. रामाची आणि हनुमंताची उपासना करणाऱ्या रामदास स्वामी यांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांची शिकवण पक्की करणाऱ्या ज्ञानाचा प्रसार करत महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. राजकारण आणि धर्मकारणावर प्रखर भाष्य करणारे समर्थ रामदास हे एकमेव संत होते. १७ व्या शतकात रचलेला दासबोध आजच्या काळातही तेवढाच परिपूर्ण वाटतो. संसार कसा करावा, संसार कसा असावा, याचे नेमके ज्ञान दिले. सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगत आरोग्याचा गुरुमंत्र रामदासांनी दिला आहे. मनावर ताबा मिळवल्यास अनेक गोष्टी सुलभ होतात, याचे ब्रह्मज्ञान रामदासांनी सकलजनांना दिले.
याच ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी श्री. योगेशबुवा रामदासी आणि श्री. अजेयबुवा रामदासी सदर व्याख्यान मालेत मार्गदर्शन करणार आहेत. २९,३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी देशस्थ ऋग्वेदी हॉल, विलेपार्ले पूर्व येथे सायंकाळी ५ ते ८.३० या वेळेत व्याख्यान होणार आहे. हा कार्यक्रम निःशुल्क असून भाविकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : +91-9167968204