Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीचे व्रत सलग १४ वर्षं केल्याने काय होतात फायदे? जाणून घ्या लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 16:47 IST2025-09-03T16:47:02+5:302025-09-03T16:47:45+5:30
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीचे व्रत महाभारत काळापासून प्रचलित आहे, अनेक जण आजही ते अखंडितपणे करतात; त्याचे नियम आणि लाभ जाणून घेऊ.

Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीचे व्रत सलग १४ वर्षं केल्याने काय होतात फायदे? जाणून घ्या लाभ
यंदा ६सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2025) आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला 'अनंत चतुर्दशी'चे व्रत केले जाते. इतर व्रतांप्रमाणे हे व्रत सर्व मंडळी करत नाहीत. कारण हा एक वसा अहे. तो आचरणात आणणे काहीसे कठीण आहे. म्हणून काही कुटुंबापुरते हे व्रत मर्यादित राहिले आहे. हे व्रत कोणी करावे याचेदेखील संकेत आहेत. धर्मबोध या ग्रंथात ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी अनंत चतुर्दशी व्रताची सविस्तर माहिती दिली आहे, ती पाहू.
अनंताचे व्रत हे पुरुषांनी करावयाचे काम्य व्रत आहे. हे व्रत सलग १४ वर्षे करावे लागते. गेलेले वैभव परत मिळावे म्हणून हे व्रत करण्याची प्रथा आहे. एखाद्या वडीलधाऱ्या अधिकारी व्यक्तीने हे व्रत सांगितल्यास अथवा अनंताचा दोरा अचानक सापडल्यास हे व्रत केले जाते. तसेच ज्यांना हे व्रत करण्याची इच्छा आहे तेदेखील हे व्रत करू शकतात. मात्र, एकदा हे व्रत करण्यास प्रारंभ केला की, ते कुळामध्ये अखंडितपणे केले जाते. चौदा वर्षांनंतर उद्यापन करून न थांबता, पुन्हा ते चालूच ठेवले जाते.
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर...
या व्रतामध्ये अनंत म्हणजे विष्णू ही प्रमुख देवता आहे. या व्रताचे विधी अतिशय काटेकोरपणे केले जातात. ते विधी पुढीलप्रमाणे आहेत-
अनंत चतुर्दशी पूजाविधी :
प्रारंभी चतुर्दशीला प्रात:काळी व्रतकर्त्याने शुचिर्भूत व्हावे. नंतर उपलब्ध असेल त्याप्रमाणे तांब्याचे अथवा चांदीचे पूर्णपात्र ठेवावे. या पूर्णपात्रात अष्टदल काढून त्यावर दर्भाच्या अंकुरांपासून केलेला सातफण्याचा शेषनाग ठेवावा. त्याच्यासमोर चौदा गाठी बांधलेला अनंताचा दोरा ठेवाव. एक कलश घेऊन तो पाना फुलांनी सजवावा. त्या कुंभात भरलेल्या पाण्याला `यमुना' मानून तिची पूजा करावी. आधी शेषाची आणि कुंभातील यमुनेची यथासांग पूजा करावी. नंतर त्याच पूर्णपात्रात अनंतमूर्तीचे पूजन करून ध्यान करावे. ध्यान करताना पुढील श्लोक म्हणावा-
नवाम्रपल्लवाभासं पिङ्गभू्रश्मश्रुलोचनम्
पिताम्बरधरं पद्मशंखचक्रगदाधरम्
अलंकृततपयोराशिं विश्वरूपं विचिन्तये।
अर्थात नवीनच आलेल्या आंब्याच्या पानांप्रमाणे ज्याची अंगकांती आहे, ज्याच्या भुवया, मिशा, डोळे पिंगट रंगाचे आहेत, ज्याने पितांबर नेसून शंख, चक्र, गदा धारण केली आहे आणि ज्याने समुद्राला भूषवले आहे, अशा विश्वरूप असलेल्या विष्णूचे मी ध्यान करतो, असे या श्लोकात म्हटले आहे.
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीचे व्रत पांडवांना कोणी सांगितले? काय लाभ झाला?
ज्यांना संस्कृत श्लोक म्हणता येणार नाही, त्यांनी केवळ भावार्थ प्राकृतात उच्चारला तरी चालेल. त्यानंतर अंगभूजा, आवरणपूजा, अष्टोत्तर शतनामपूजा या अंगभूत पूजांसह षोडशोपचारे पूजा करावी. शेवटी पुष्पांजली झाल्यानंतर अर्घ्य द्यावे. त्यानंतर चौदा गाठींच्या दोऱ्याची पूजा करून तो व्रतकर्त्याने आपल्या हाताला बांधावा. त्यापूर्वी हाताला बांधलेल्या दोऱ्याचे विसर्जन करावे. व्रताची सांगता करताना दाम्पत्याला भोजन घालावे.
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
सलग चौदा वर्षे व्रत पूर्ण झाल्यावर उद्यापन विधी-
त्रयोदशीला व्रतकर्त्याने एकभुक्त राहावे. चतुर्दशीला तीळ आणि आवळ्याचा गर लावून स्नान करून शुचिर्भूत व्हावे. त्यानंतर अनंताची पूजा करावी. त्या रात्री अश्वत्थाच्या समिधा, तीळ, यव, व्रीही, घृत यांनी व्रतदेवतांसाठी हवन करावे. नंतर सर्वांनी कथा श्रवण करावी. पौर्णिमेला पुुन्हा अनंताची विधिवत पूजा करावी. आचार्यांची पूजा करून त्यांना यथाशक्ती दक्षिणा द्यावी. शेवटी सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यावेत. भगवान विष्णूंचे स्मरण करून व्रतकर्त्याने पारण्याचे भोजन करावे.