Voting in peace in Parli constituency | परळी मतदारसंघात शांततेत मतदान

परळी मतदारसंघात शांततेत मतदान

ठळक मुद्देपरळी विधानसभा निवडणूक : १६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात झाले बंद

परळी : विधानसभा मतदारसंघातील एकूण ३३५ मतदान केंद्रांवर सर्वत्र शांततेत मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. काही ठिकाणी मतदान यंत्रणेत बिघाड झाली होते. तेथे लगेच दुसरे मतदान यंत्र बसविण्यात आले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह १६ उमेदवारांचे भवितव्य सोमवारी मतदान यंत्रात बंद झाले.
या मतदारसंघात पालकमंत्री पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे यांच्यात ‘बिग फाइट’ झाली. धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांनी नाथरा येथे सकाळी मतदान करून शहर व ग्रामीण भागातील मतदान केंद्रास भेटी दिल्या. मुंडे बहीण- भावामुळे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली आहे. या मतदारसंघातून भाजपच्या पंकजा मुंडे, की राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे हे निवडून येतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे .या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीतर्फे भीमराव सातपुते हे उमेदवार होते.
सकाळी ७ ते ९ दरम्यान ३ टक्के, ९ ते ११ दरम्यान १८, ११ ते १ या कालावधीत ३० टक्के, ४ वाजेपर्यंत ४७ टक्के आणि ५ वाजेपर्यंत ६२ टक्के मतदान झाले.
६ वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होती, शहरात सकाळी ११ नंतर पावसाने उघडीप दिल्याने मतदान केंद्रावर मतदारांची संख्या वाढली, बाहेरगावचे मतदार मोठ्या प्रमाणात आले होते. पुणे, मुंबई, औरंगाबाद येथील परळी मतदार संघाचे मतदार आले होते त्यांनी ही आपल्या मतदानाचा हक्क बजाविला. मतदान केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.
विद्यानगर येथील सुमतीबाई गुलाबराव रणदिवे (९५ ) सुलोचना भगवानराव दगडगुंडे (९३) रा. गणेशपार परळी वैजनाथ यांनी ही मतदानाचा हक्क बजविला. येथील जि.प. कन्या शाळेतील मतदान केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यात पावसामुळे चिखल झाल्याने मतदारांची गैरसोय झाली.
पंकजा मुंडे यांनी घेतले गोपीनाथगडावर जाऊन दर्शन
पंकजा मुंडे यांनी मतदानाच्या आधी त्यांनी गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. पंकजा मुंडे, मातोश्री प्रज्ञाताई मुंडे, भगिनी खा. डॉ.प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे यांनी प्रथम सकाळी दक्षिणमुखी गणपती, प्रभू वैद्यनाथाला अभिषेक करून दर्शन घेतले.
नाथरा येथे मतदानासाठी जाण्याआधी धनंजय मुंडे यांनी सोमवारी सकाळी वडील स्व. पंडितअण्णा मुंडे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले तसेच आईचे आशीर्वाद घेतले व दिवसाची सुरुवात केली. मतदानाला जाण्याआधी धनंजय मुंडे यांची कन्या आदिश्री हिनेही शुभेच्छा दिल्या.

Web Title: Voting in peace in Parli constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.