बोहल्यावर चढल्यानंतर बजावला मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:44 IST2019-04-19T00:43:30+5:302019-04-19T00:44:22+5:30
लोकशाहीचा उत्सव आणि संसाराची सुरुवात हा योगायोग आल्याने लग्नानंतर संसाराला सुरुवात करण्याआधी गावातील देवदेवतांचे दर्शन घेण्याबरोबरच लोकशाहीच्या दरबारात नवदाम्पत्यांनी हजेरी लावली.

बोहल्यावर चढल्यानंतर बजावला मतदानाचा हक्क
लोकमत न्यूज नेटवर्क ।
बीड : लोकशाहीचा उत्सव आणि संसाराची सुरुवात हा योगायोग आल्याने लग्नानंतर संसाराला सुरुवात करण्याआधी गावातील देवदेवतांचे दर्शन घेण्याबरोबरच लोकशाहीच्या दरबारात नवदाम्पत्यांनी हजेरी लावली. नातेवाईक अन् ग्रामस्थांनी मतदान केंद्रापर्यंत त्यांची अतिशय उत्साहात वरात काढली.
परळी तालुक्यातील खोडवा सावरगाव येथील धनराज यशवंत दहीफळे यांचा शुभविवाह गुरु वारी मतदानाच्या दिवशी धर्मापुरी येथील जिजा महादेव फड यांच्यासमवेत झाला. धर्मापुरीत शुभविवाह झाल्यानंतर वधूसह नवरदेव खोडवा सावरगाव येथे आले. त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत नातेवाईक ही होते अशी माहिती तलाठी अमोल सवाईशाम यांनी दिली.
आष्टी तालुक्यातील टाकळी आमिया येथे लोकसभेचे मतदान असल्याने वधू - वरास मतदानाला जाताना हलगी वाजून नेण्यात आले. सोबत सामाजिक कार्यकर्ते अशोक चौधरी.
गोमळवाडा येथील मारुती भागवत भुंबे या युवकाचा १७ एप्रिल रोजी गावातील श्रद्धा या मुलीशी विवाह सम्पन्न झाला. रीतीरिवाजाप्रमाणे दुसऱ्या दिवशी देवदर्शन घेण्यासाठी जायचे असते. परंतु या वधूवराने आधी मतदानाचा हक्क बजावला व नंतर देवदर्शनासाठी निघून गेले.