बीड नगरपरिषदेत राजकीय पेच; क्षीरसागर बंधू एकत्र येणार की पंडित क्षीरसागरांची मदत घेणार?
By सोमनाथ खताळ | Updated: December 24, 2025 12:25 IST2025-12-24T12:24:25+5:302025-12-24T12:25:13+5:30
बीड नगरपालिकेत सत्तेच्या बहुमतासाठी पेच कायम; अजित पवार गटाने नगराध्यक्षपद खिशात घातले खरे, मात्र ५२ सदस्यीय सभागृहात सत्तेच्या मॅजिक फिगरपर्यंत (बहुमतापर्यंत) पोहोचताना दमछाक होणार.

बीड नगरपरिषदेत राजकीय पेच; क्षीरसागर बंधू एकत्र येणार की पंडित क्षीरसागरांची मदत घेणार?
बीड : विधानसभा निवडणुकीनंतर बीड नगरपालिकेतही ‘क्षीरसागर मुक्ती’चा नारा देत राष्ट्रवादी (अजित पवार) आणि भाजपने जोरदार प्रचार केला होता. निवडणुकीच्या निकालानंतर प्रेमलता पारवे यांच्या रूपाने अजित पवार गटाने नगराध्यक्षपद खिशात घातले खरे, मात्र ५२ सदस्यीय सभागृहात सत्तेच्या मॅजिक फिगरपर्यंत (बहुमतापर्यंत) पोहोचताना आता या गटाची चांगलीच दमछाक होणार आहे. त्यामुळे पंडित क्षीरसागरांची मदत घेणार की क्षीरसागर बंधू एकत्र येऊन बहुमत मिळवणार? याकडे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे स्वतःचे १९ सदस्य असून, त्यांना मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेचे ३ सदस्य गृहीत धरले तरी आकडा २२ पर्यंत पोहोचतो. काँग्रेस, एमआयएम आणि ठाकरे सेनेची मदत घेतली तरी हा आकडा २५ होतो, म्हणजेच बहुमतासाठी अजूनही २ सदस्यांची गरज भासणार आहे. एकूणच, नगराध्यक्षपद मिळवूनही बीड पालिकेचा गाडा हाकण्यासाठी अजित पवार गटाला क्षीरसागरांच्या 'बॅकिंग'शिवाय पर्याय उरलेला नाही, हे दिसत आहे.
क्षीरसागरांच्या मदतीशिवाय पर्याय नाही
बहुमतासाठी आता अजित पवार गटाला एकतर भाजपमधील डॉ. योगेश क्षीरसागर यांची मदत घ्यावी लागेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याशी हातमिळवणी करावी लागेल. दोन दिवसांपूर्वीच भाजपच्या नूतन नगरसेविका डॉ. सारिका क्षीरसागर यांनी "बीड क्षीरसागरमुक्त झाला नसून आमचे १५ आणि दीर (संदीप क्षीरसागर) यांचे १४ असे सदस्य आमच्याकडे आहेत," असा दावा करून राजकीय खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे क्षीरसागर बंधुंच्या एकीबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
आमदार पंडितांचेही सूचक विधान
अजित पवार गटाचे नेते आणि गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी निवडणुकीनंतर दोन्ही क्षीरसागर बंधूंवर कडाडून टीका केली होती. मात्र, सत्तेची समीकरणे जुळवताना त्यांनी "पुढील दोन-तीन दिवसांत सर्व समजेल" असे म्हणत मदत घेण्याबाबत सूचक विधान केले आहे. त्यामुळे सत्तेसाठी क्षीरसागर बंधू पुन्हा एकत्र येतात की अजित पवार गट क्षीरसागरांना सोबत घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय आहे बहुमताचे गणित?
राष्ट्रवादी (अजित पवार गट) : १९
भाजप (क्षीरसागर गट) : १५
राष्ट्रवादी (शरद पवार गट - संदीप क्षीरसागर) : १२
शिवसेना (शिंदे गट) : ०३
इतर (एमआयएम, काँग्रेस, ठाकरे सेना) : ०३