महाशिवरात्रीसाठी परळी सज्ज; श्री वैद्यनाथ मंदिरावर रोषणाई, बॅरिकेटस अन् मंडपचे काम पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 15:36 IST2025-02-23T15:36:08+5:302025-02-23T15:36:57+5:30
26 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रुद्राभिषेक व 28 फेब्रुवारी रोजी श्री वैद्यनाथांची पालखी मिरवणूक

महाशिवरात्रीसाठी परळी सज्ज; श्री वैद्यनाथ मंदिरावर रोषणाई, बॅरिकेटस अन् मंडपचे काम पूर्ण
परळी (संजय खाकरे): देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या अनुषंगाने गर्दी सुरू झाली आहे. रविवारी राज्य व परराज्यातील भाविक दाखल झाल्याने भाविकांच्या गर्दीने वैद्यनाथ मंदिर परिसर फुलले आहे. श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने दि. 25 फेब्रुवारी ते 1 मार्चदरम्यान महाशिवरात्र यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी 26 फेब्रुवारी रोजी रात्री सहा ते आठ दरम्यान श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने जिल्हाधिकारी बीड यांच्या हस्ते श्री वैद्यनाथास रुद्राभिषेक करण्यात येणार आहे व 28 फेब्रुवारी सायंकाळी सहा वाजता श्री वैद्यनाथाची पालखी सवाद्य मिरवणुकीने निघणार आहे. प्रसिद्ध गायिका चैत्राली अभ्यंकर यांचा भक्ती गीत व अभंगवाणी कार्यक्रम देशमुख पाराजवळ होणार आहे.
26 फेब्रुवारी महाशिवरात्र यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यात्रेच्या सुव्यवस्थेसाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांना 'श्रीं'चे दर्शन सुलभ व्हावे, मंदिराचे पावित्र्य राखले जावे आणि गर्दीचे नियमन व्हावे, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, तसेच पायऱ्यावर लोखंडी बॅरिकेट्स उभारणे व त्यावर मंडप टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.
महाशिवरात्रीनिमित्त दर्शन व्यवस्था दर्शनासाठी पुरुष व महिलांसाठी वेगळ्या रांगा असतील. प्रवेश व बाहेर जाण्याचे मार्ग वेगळे ठेवण्यात आले आहेत. प्रवेश पत्रिका (पास) शुल्क ₹100/- असून, दर्शनासाठी पास आवश्यक आहे. दर्शनाची वेळ: २५ फेब्रुवारी २०२५ (मंगळवार) रात्री १२:०० ते २६ फेब्रुवारी २०२५ (बुधवार) रात्री १२:०० पर्यंत असेल. प्रवेश पत्रिका खरेदीसाठी वैद्यनाथ बँक (परळी शाखा), स्टेट बँक ऑफ इंडिया (टॉवर आणि गांधी मार्केट शाखा), आयडीबीआय बँक, महाराष्ट्र बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, दीनदयाळ बँक आणि वैद्यनाथ बँकेच्या स्टॉलमध्ये सोय उपलब्ध आहे.
विशेष कार्यक्रम रुद्राभिषेक-दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ (बुधवार), वेळ: संध्याकाळी ६ ते ८ मा. जिल्हाधिकारी, बीड यांच्या हस्ते ‘श्री’जींस रुद्राभिषेक केला जाईल.
अभिषेक शुल्क- व्यक्ती ₹200/- | सपत्नीक ₹300/- वार्षिक अभिषेक करणाऱ्यांनाही महाशिवरात्र अभिषेकासाठी स्वतंत्र पावती घ्यावी लागेल.
परळी परिसरातील शिवभक्तांसाठी विशेष दर्शन व्यवस्था: माजी सैनिक आणि परळी परिसरातील शिवभक्तांना विनामूल्य दर्शनाची सोय, २६ फेब्रुवारी २०२५ (बुधवार) रात्री १०:०० ते १२:०० (मंदिर बंद होईपर्यंत), ओळखपत्र (आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड इ.) सादर करणे आवश्यक.
भक्तीगीत आणि पालखी मिरवणूक: २८ फेब्रुवारी २०२५ (शुक्रवार) सायं. ५ वाजता 'श्रीं'ची पालखी सवाद्य मिरवणुकीने प्रस्थान करेल. सायं. ६ वा. देशमुख पाराजवळ गायिका चैत्राली अभ्यंकर (पुणे) यांचा भक्तीगीत व अभंगवाणी कार्यक्रम. रात्रौ ९ वा. अंबेवेस येथे शोभेची दारू उडविण्यात येईल. गणेशपार, नांदूरवेस, गोपनपाळे गल्ली येथे कलावंतांची हजेरी आणि नंतर पालखी मंदिरात परत. मानाची बिदागी वाटप: १ मार्च २०२५ (शनिवार) सकाळी १० ते १ स्थळ: श्री वैजनाथ मंदिर भाविकांसाठी सूचना दर्शनासाठी प्रवेश पत्रिका आवश्यक. गर्दीच्या नियमनासाठी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे. विशेष दर्शनासाठी ओळखपत्र सोबत ठेवावे. पालखी मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. श्री व्यंकटेश बाबुराव मुंडे (अध्यक्ष तथा तहसीलदार, परळी वै.) बाबासाहेब वामनराव देशमुख (सेक्रेटरी) व सर्व विश्वस्त, श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट, परळी वैजनाथ, जि. बीड.