“हर हर महादेव”च्या जयघोषाने परळीनगरी शिवमय; हजारो भाविकांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 14:02 IST2026-02-15T14:02:08+5:302026-02-15T14:02:45+5:30

प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी युक्रेनमधील भाविक परळीत दाखल.

Mahashivaratri Parli vaijnath citi chants of "Har Har Mahadev"; Thousands of devotees had the darshan of Lord Vaidyanath | “हर हर महादेव”च्या जयघोषाने परळीनगरी शिवमय; हजारो भाविकांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

“हर हर महादेव”च्या जयघोषाने परळीनगरी शिवमय; हजारो भाविकांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

संजय खाकरे/परळी वैजनाथ : महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त “हर हर महादेव”च्या अखंड जयघोषाने संपूर्ण वैद्यनाथनगरी शिवमय झाली आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात आज हजारो शिवभक्तांनी प्रभू वैद्यनाथांचे श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहात दर्शन घेतले. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तीचा महासागर उसळला होता.

मंदिराची भव्य सजावट, भाविक भारावले

महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सुमारे वीस क्विंटल झेंडू व गुलाब फुलांनी प्रभू वैद्यनाथांचा दरबार सजवण्यात आला असून, विविध अलंकारांनी सजलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन घेताना भाविक भारावून गेले.

देश-विदेशातून भाविकांची उपस्थिती

महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येलाच देशभरातील भाविकांचे परळीत आगमन सुरू झाले होते. विशेष म्हणजे युक्रेन येथील २१ भाविकांनी वैद्यनाथांचे दर्शन घेतले, तर उत्तराखंड राज्यातील १५ महिला भाविकांनी सकाळी उपस्थित राहून अभिषेक व दर्शनाचा लाभ घेतला. रात्री बारा वाजल्यापासूनच दर्शनासाठी मंदिरात लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

दर्शनासाठी विशेष व्यवस्था

श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी धर्मदर्शन, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा तसेच पासधारकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे हजारो भाविकांना सुरळीत आणि सुलभ दर्शन घेता आले. मंदिर परिसरात पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता, त्यामुळे उत्सव शांततेत पार पडला.

भाविकांसाठी सेवा उपक्रम

मंदिर परिसरात प्रसाद, पेढे आणि पूजासाहित्याच्या दुकानांवर भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. विविध सामाजिक व धार्मिक संस्थांच्या वतीने उपवासासाठी साबुदाणा खिचडी, राजगिऱ्याचे व शेंगदाण्याचे लाडू, तसेच पिण्याच्या पाण्याचे वाटप करून भाविकांची सेवा करण्यात आली.

शहरातील अन्य मंदिरांतही गर्दी

शहरातील सुरवेश्वर मंदिर, पंचमुखी महादेव मंदिर, तसेच जिरेवाडी येथील श्री सोमेश्वर मंदिरात जलाभिषेक व दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. जिरेवाडी येथून प्रभू सोमेश्वर महाराजांची पालखी वाजत-गाजत वैद्यनाथांच्या दर्शनासाठी परळीत दाखल झाली. शहरातील विविध ठिकाणी या पालखीचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले.

संत जगमित्र नागा संजीवन समाधी मंदिरात भाविकांची रांग

संत परंपरेचे पवित्र स्थान असलेल्या श्री संत जगमित्र नागा संजीवन समाधी मंदिरात देखील पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एकूणच काय, तर महाशिवरात्रीच्या या दिव्य पर्वामुळे संपूर्ण परळी नगरीत भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे अनोखे वातावरण निर्माण झाले आहे. 

Web Title : परली में महाशिवरात्रि की धूम; हजारों ने वैद्यनाथ मंदिर के दर्शन किए।

Web Summary : परली में महाशिवरात्रि का भव्य आयोजन हुआ। 'हर हर महादेव' के जयकारों के साथ हजारों भक्तों ने वैद्यनाथ मंदिर में दर्शन किए। मंदिर को खूबसूरती से सजाया गया था। यूक्रेन सहित भारत और विदेशों से भक्तों ने भाग लिया। विशेष व्यवस्था से सभी को सुलभ दर्शन हुए।

Web Title : Parli celebrates Mahashivratri with fervor; thousands visit Vaidyanath Temple.

Web Summary : Parli witnessed grand Mahashivratri celebrations. Thousands of devotees thronged Vaidyanath Temple, chanting 'Har Har Mahadev'. The temple was beautifully decorated. Devotees from across India and abroad, including Ukraine, participated in the festivities. Special arrangements ensured smooth darshan for all.