मिरवणुकीत हृद्यविकाराचा झटका आल्याने गणेशभक्ताचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 17:10 IST2019-09-03T17:08:04+5:302019-09-03T17:10:25+5:30
जल्लोष करत असतानाच गोंडे यांना चक्कर आली व जमीनीवर कोसळले

मिरवणुकीत हृद्यविकाराचा झटका आल्याने गणेशभक्ताचा मृत्यू
अंबाजोगाई (बीड ) : गणपतीच्या मिरवणुकीत नाचताना ३६ वर्षीय युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना अंबाजोगाई शहरातील रविवार पेठ ( पटाईत गल्ली ) येथे सोमवारी रात्री आठ ते साडे आठच्या दरम्यान घडली. श्याम महादेव गोंडे असे त्या युवकाचे नाव आहे.टायर रिमोल्डींगचा त्यांचा व्यवसाय होता. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सोमवारी गणेश चतुर्थी होती. त्या निमित्ताने सर्वत्र गणेशाची स्थापना करण्यासाठी तरुणांची लगबग सुरू होती .रविवार पेठेतील ( पटाईत गल्ली) युवकांनी गणेश स्थापना करण्यासाठी गणपतीच्या मूर्तीची खरेदी करून वाजत-गाजत मिरवणूक काढली. ती मिरवणूक रविवार पेठ गल्ली या ठिकाणी आली. गणपतीची मिरवणूक आली तेव्हा मयत शाम महादेव गोंडे हे आपल्या घराच्या समोर बसलेले होते. मिरवणूक आल्याचे पाहून श्याम गोंडे हे मिरवणुकीत सामील झाले. जल्लोष करत असतानाच गोंडे यांना चक्कर आली व जमीनीवर कोसळले. उपस्थित तरुणांनी गोंडे यांना तात्काळ उपचारासाठी येथील स्वामी रामानंदतीर्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोंडे यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, दोन मुली, आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.