जनतेसाठी लढतो म्हणून राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न- धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:03 IST2019-10-16T00:02:33+5:302019-10-16T00:03:23+5:30
माझी लढाई विकासासाठी आणि जनसामान्यांसाठी असताना मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

जनतेसाठी लढतो म्हणून राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न- धनंजय मुंडे
घाटनांदूर : माझी लढाई विकासासाठी आणि जनसामान्यांसाठी असताना मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.
घाटनांदूर येथे मंगळवारी रात्री आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री पंडीतराव दौंड, तर प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन बन्सीआण्णा सिरसाट, राकॉँचे परळी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष गोविंदराव देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष गणेश देशमुख, सरपंच ज्ञानोबा जाधव, बाळासाहेब देशमुख , शेख मुसाशेठ, सत्यजित सिरसाट, शेख मुक्तार, काशिनाथ कातकडे, बालासाहेब डोंगरे,अॅड इंद्रजीत निळे, चंद्रकांत वाकडे, धनंजय साळुंके उपस्थित होते. धनंजय मुंडे म्हणाले, मी राजकारण,समाजकारणात अगोदर आलो मग मी विरोध कसा करणार,मला विकासाचे राजकारण करायचे आहे. मी २४ तास लोकांचे फोन उचलतो बोलतो. अडचणीला धावून जातो खऱ्या अर्थाने मीच स्व. साहेबांचा वारसा चालवित आहे. रस्ते,नाली,सभागृह करणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. याला विकास म्हणत नाहीत ,रोजगार निर्माण करणारे उद्योग, सिंचन व्यवस्था, शिक्षण, व्यवसायासाठी सुविधा हे फार महत्त्वाचे असून हे सर्व निर्माण करण्यासाठी मी निवडणूक लढवित आहे. डिजीटल बोर्ड लावून व फसव्या घोषणा करून विकास होत नसल्याचा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला. या प्रसंगी पंडीतराव दौंड,बाळासाहेब देशमुख,किशनराव बावणे, बालासाहेब राजमाने यांचे भाषण झाले.