Beed: पराभवातही दिसला 'विजयी' संस्कार! आभार मानत परळीची लेक मतदारांच्या दारात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 19:31 IST2025-12-26T19:19:57+5:302025-12-26T19:31:05+5:30
राजकारणात हार-जीत होतच राहील, पण माणुसकी टिकली पाहिजे! २४ मतांनी हुलकावणी देऊनही सारिका हरंगुळे मतदारांच्या दारात.

Beed: पराभवातही दिसला 'विजयी' संस्कार! आभार मानत परळीची लेक मतदारांच्या दारात
परळी वैजनाथ: राजकारण म्हणजे केवळ सत्ता आणि खुर्चीची ओढाताण नाही, तर ते जनतेशी जोडलेलं एक नातं आहे, हे परळीच्या प्रभाग १६ 'अ' मधील महायुतीच्या उमेदवार सारिका सुशील हरंगुळे यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. अवघ्या २४ मतांच्या अत्यंत निसटत्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला असूनही, सारिका हरंगुळे यांनी २५ डिसेंबर रोजी स्वतः प्रभागात जाऊन प्रत्येक मतदाराचे मनापासून आभार मानले. त्यांच्या या कृतीने "राजकारण गेलं चुलीत, आधी माणुसकी!" या भावनेचा प्रत्यय परळीकरांना आला.
अटीतटीची लढत आणि मतांची विभागणी
प्रभाग १६ 'अ' मध्ये यावेळेस कमालीची चुरस पाहायला मिळाली. महायुतीच्या सारिका हरंगुळे यांना १४३० मते मिळाली, तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्या उमेदवार कुरेशी अरेफा बेगम यांना १४५४ मते मिळाली. केवळ २४ मतांनी विजय-पराभवाचे पारडे फिरले. या लढतीत अपक्ष उमेदवार रूपाली महेश बागवाले यांनी १०१५ मते घेतली.
बालेकिल्ल्यात धक्का, पण जिद्द कायम
हा प्रभाग महायुतीचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, १६ 'अ' सह १६ 'ब' मध्येही महायुतीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तेथे नितीन बागवाले (राष्ट्रवादी - पवार गट) यांनी तखी खान यांचा पराभव केला. दोन्ही जागांवर पराभव झाला असतानाही, सारिका हरंगुळे यांनी न डगमगता दुसऱ्याच दिवशी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.
माणुसकीचा विजय
"निकाल काहीही लागो ज्या जनतेने मला १४३० मतांचं बळ दिलं, त्यांच्याप्रती कृतज्ञ राहणं माझं कर्तव्य आहे," अशा शब्दांत सारिका हरंगुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पराभवानंतर घरी बसून राहण्याऐवजी लोकांच्या सुख-दुःखात सामील होण्याच्या त्यांच्या या भूमिकेचे परळीच्या राजकीय वर्तुळातून कौतुक होत आहे. विजयी उमेदवार कुरेशी अरेफा बेगम यांचे अभिनंदन करत, प्रभागाच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर असू, अशी ग्वाही देऊन त्यांनी एक प्रगल्भ राजकीय संस्कृती जोपासली आहे.
पद हरले तरी, तुमचं प्रेम जिंकलं आहे!
तुमच्या प्रेमासाठी आणि आशीर्वादासाठी मी सदैव ऋणी राहीन. पद असो वा नसो, तुमच्या प्रत्येक सुख-दु:खात, अडचणीत आणि प्रभागाच्या विकासासाठी मी 'सारिका' म्हणून सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असेन. भविष्यात कधीही कोणतीही अडचण आल्यास मला फक्त एक हाक द्या, तुमची ही लेक, तुमची ही बहीण आपल्या सेवेसाठी तत्काळ हजर असेल. आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, हीच ग्वाही देते!
- सारिका सुशील हरंगुळे (महायुती उमेदवार - प्रभाग १६ अ, परळी)