कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:33 IST2025-10-01T12:30:58+5:302025-10-01T12:33:51+5:30
खासदार बजरंग सोनवणे यांचा दौरा वादात!

कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल
बीड: परतीच्या पावसामुळे आणि पैठणच्या धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील अनेक गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहेत. घरात पाणी शिरल्याने नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले असून, शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय नेत्यांचे दौरे सुरू आहेत. मात्र, बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या दौऱ्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे.
पूरग्रस्त भागात होडीवरुन दौरा
खासदार बजरंग सोनवणे यांनी मंगळवारी माजलगाव तालुक्यातील काळेगावथडी, डुब्बाथडी, कवडगावथडी, पुरुषोत्तमपुरी, रिधोरी, हिवरा अशा गावांना भेट दिली. पाणी शिरलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी ते गेले असता, त्यांनी थर्माकॉलच्या होडीवर बसून परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते मोहन जगताप आणि एक कार्यकर्ताही होडीवर बसलेला दिसला.
Beed MP Bajrang Sonawane, conducted a tour of the flood-affected areas in Majalgaon, Maharashtra, to assess the damage caused by recent heavy rainfall. However, the visit has sparked widespread criticism after visuals surfaced showing the MP traveling through waterlogged streets… pic.twitter.com/0dMi4LMEdC
— NextMinute News (@nextminutenews7) September 30, 2025
गावकरी पाण्यात, खासदार होडीत
यावेळी गावातील चार-पास तरुण मानेपर्यंत पाणी साचलेल्या भागातून होडी ओढत होते, तर खासदार सोनवणे व इतर नेते आरामात होडीवर बसलेले दिसले. पाणी जास्त असल्यामुळे खासदार खाली उतरले नाहीत. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. आपले पांढरे कपडे खराब होऊ नयेत, म्हणून खासदार सोवनणे पाण्यात उतरले नाहीत, अशी त्यांच्यावर टीका होत आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी गेले की स्वतःच्या सोयीसाठी? असा सवाल उपस्थित केला जातोय. काहींनी तर याला “फोटोशूट दौरा” असेही म्हटले आहे.
शेतकऱ्यांची नाराजी
पूरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून मदतीची अपेक्षा अजूनही पूर्ण झालेली नाही. या पार्श्वभूमीवर खासदारांचा असा होडी प्रवास आणि फोटोसेशनमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दौऱ्यात खासदार सोनवणे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शासन दरबारी आवाज उठवू, असे आश्वासन दिले. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडीओवर त्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.