परळीत फरशी कामगाराचा विजय; महायुतीला चारीमुंड्या चित करत काँग्रेसचे 'बब्बू' नगरसेवक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 18:26 IST2025-12-26T18:21:16+5:302025-12-26T18:26:14+5:30
परळीत ‘सामान्य माणसाचा’ असामान्य विजय; काँग्रेसच्या एकमेव वाघाने महायुतीला चारीमुंड्या चित केलं

परळीत फरशी कामगाराचा विजय; महायुतीला चारीमुंड्या चित करत काँग्रेसचे 'बब्बू' नगरसेवक!
परळी वैजनाथ: परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ 'अ' मधून काँग्रेसचे उमेदवार, अवघे ३२ वर्षांचे फरशी कामगार फारुख गणी सय्यद ऊर्फ बब्बू यांनी महायुतीच्या तगड्या उमेदवाराचा पराभव करत इतिहास घडवला आहे. काँग्रेसने १६ उमेदवार उतरवले होते, मात्र त्यातील केवळ 'बब्बू' हेच विजयी झाले, ही बाब त्यांच्या विजयाचे मोठेपण अधोरेखित करते.
ना पैसा, ना गाड्या... फक्त विश्वास!
फारुख गणी यांचा प्रवास थक्क करणारा आहे. व्यवसायाने मिस्त्रीच्या हाताखाली काम करणारा हा तरुण, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या खांद्यावर असताना निवडणुकीच्या रिंगणात उतरला. विरोधकांकडे प्रचारासाठी गाड्यांचा ताफा आणि पैशांचे बळ असताना, बब्बू मात्र पायी चालत मतदारांच्या दारात जात होते. "मी तुमच्यातलाच एक आहे, माझ्यावर विश्वास ठेवा," ही त्यांची साधी विनंती बरकत नगर, खुदबे नगर आणि जमजम कॉलनीतील वयोवृद्ध मतदारांच्या काळजाला भिडली.
अडचणीत मिळालेली साथ
सुरुवातीला या जागेवरून निवडणूक लढवण्यास कोणाकडेही धैर्य नव्हते. मात्र, काँग्रेस शहराध्यक्ष सय्यद हनीफ (बहादूर) आणि कार्यकर्ते बदर भाई यांनी बब्बूंच्या प्रामाणिकपणावर विश्वास दाखवला. २१ डिसेंबरला लागलेल्या निकालात बब्बू यांना १२१६ मते मिळाली, तर महायुतीच्या उमेदवाराला ११४४ मतांवर समाधान मानावे लागले. ७२ मतांच्या या फरकाने परळीत एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.
"जनतेची भाषा मला कळते"
विजयानंतर सत्काराला उत्तर देताना बब्बू भावूक झाले. त्यांना लिहिता-वाचता येत नाही, ही वस्तुस्थिती त्यांनी कधीही लपवली नाही. "माझ्याकडे मोठी पदवी नाही, पण माझ्या प्रभागातील जनतेच्या डोळ्यांतील पाणी वाचण्याची ताकद माझ्याकडे आहे. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी रक्ताचं पाणी करेन," अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यांच्या या विजयाने हे सिद्ध केले की, राजकारणात टिकण्यासाठी केवळ पैसाच नाही, तर 'माणुसकी'ची कमाईही महत्त्वाची असते.
विजयाचे समीकरण: एका नजरेत
नाव: फारुख गणी सय्यद (बब्बू)
व्यवसाय: फरशी कामगार
पक्ष: राष्ट्रीय काँग्रेस (परळीतील एकमेव विजयी)
मिळालेली मते: १२१६ विजयी
फरक: ७२ मते
विरोधक: महायुती (शेख अजीम मुजीब)