केजमध्ये धारदार शस्त्राने तरूणाचा खून, संतप्त जमावाने संशयिताचे घर पेटवले
By सोमनाथ खताळ | Updated: April 23, 2024 22:26 IST2024-04-23T22:25:33+5:302024-04-23T22:26:15+5:30
केजच्या क्रांतिनगर भागातील घटना

केजमध्ये धारदार शस्त्राने तरूणाचा खून, संतप्त जमावाने संशयिताचे घर पेटवले
केज (जि.बीड) : येथील क्रांतिनगर भागातील गोरख महावीर हजारे (वय १७ वर्षे) या तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजता घडली.
हल्ला झाल्यानंतर जखमी गोरख हजारे या तरुणास काही युवकांनी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, परंतु वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन व कर्मचारी यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन माहिती घेतली.
सर्व नातेवाईक व नागरिकांना त्यांनी शांततेचे आवाहन करून, आरोपीला तातडीने अटक करण्यात येऊन कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. मयत तरुणाचे नातेवाईक व नागरिक हे केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला तातडीने अटक करावे, यासाठी जमा झाले होते. हल्ला कोणी आणि का केला, हे मात्र समजू शकले नाही. दरम्यान, संतप्त जमावाने सनी उर्फ अजिंक्य शामराव लांडगे याच्यावर संशय घेत रात्री उशिरा त्याचे घर पेटवून दिले.